दर दिवशी नवनव्या तांत्रिक बिघाडांमुळे विस्कळीत होणाऱ्या मध्य रेल्वेवर गुरुवारी आणखी एक दुर्घटना झाली. रुळांवरून गाडय़ा घसरण्याची गेल्या दोन महिन्यांतील आठवी घटना गुरुवारी कल्याण स्थानकात घडली. अमरावतीहून मुंबईला येणाऱ्या अमरावती-मुंबई एक्सप्रेसचे इंजिन आणि साधारण श्रेणीचा डबा रुळांवरून घसरला. पहाटेच्या या घटनेनंतर मध्य रेल्वेमार्गावर हाहा:कार उडाला आणि प्रवाशांना आपली कार्यालये गाठण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला. ही गाडी घसरण्यामागे रुळाच्या खालील बाजूस तडा गेल्याचे प्राथमिक कारण समोर येत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वेच्या कामकाजात गाडी रुळावरून घसरणे, हा खूपच मोठा आणि नामुष्कीचा दोष मानला जातो. ऑगस्टच्या मध्यापासून मध्य रेल्वेवर तब्बल सात ते आठ वेळा रुळांवरून गाडी घसरली आहे. सुदैवाने कोणत्याही घटनेत जीवितहानी झाली नाही. अमरावतीहून मुंबईला येणारी अमरावती एक्सप्रेस गुरुवारी पहाटे कल्याण स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक चारमध्ये शिरताना घसरली. पहाटे ४.५० वाजता घडलेल्या या घटनेनंतर नाशिक-इगतपुरी-कसारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. बिघाड दुरुस्तीसाठी तीन तासांपेक्षा जास्त वेळ गेला.  अखेर साडेआठच्या सुमारास दोन्ही बाजूंचा मार्ग मोकळा करण्यात आला. मात्र तब्बल ६३ उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या.
प्रवासी हवालदिल
सकाळच्या वेळेत झालेल्या या घटनेमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. आसनगाव-टिटवाळा-कल्याण ही वाहतूक बंद असल्याने येथील लोकांना बस किंवा खासगी वाहनांनी कल्याणपर्यंत यावे लागले. तसेच कल्याणपासून पुढे दादपर्यंतच्या स्थानकांवर प्रचंड गर्दी होती. तसेच येणाऱ्या गाडय़ा प्रचंड भरून येत असल्याने अधल्या-मधल्या स्थानकांवर गाडीत शिरायला जागा नव्हती. गाडय़ा सव्वा ते पावणे दोन तास उशिराने धावत होत्या. हा उशीर संध्याकाळपर्यंत सुरू होता.
कारण काय?
कल्याण स्थानकाजवळ हिऱ्याच्या आकाराचे रेल्वे रुळांचे क्रॉसिंग आहे. या क्रॉसिंगजवळच रुळाला खालच्या बाजूला तडा गेला आणि त्यामुळे गाडी रुळावरून घसरली, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. साधारणपणे अशा घटनांमध्ये रुळाच्या पृष्ठभागावर तडा जातो. मात्र रुळाच्या खालच्या बाजूल तडा जाण्याची घटना खूपच दुर्मिळ आणि शोधण्यास कठीण असते, असे हे अधिकारी म्हणाले.
वेग फक्त १५ किमी प्रतितास!
गेल्या दोन महिन्यांत मध्य रेल्वेवर रुळावरून गाडी घसरण्याच्या आठ घटना घडल्या. या सर्वच घटनांमध्ये गाडीचा वेग १५ किमी प्रतितास किंवा त्याहीपेक्षा कमी होता. साधारणपणे गाडीचा वेग जास्त असेल, तर गाडी रुळांवरून घसरते. मात्र एवढा कमी वेग असतानाही गाडी कशी घसरते, याबाबत अधिकाऱ्यांत संभ्रम आहे.
खासदार मात्र सुशेगात
मुंबईच्या उपनगरीय क्षेत्रात अडीच महिन्यांत आठ वेळा गाडय़ा घसरूनही एकाही खासदाराने यासाठी आवाज उठवलेला नाही. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विचारले असता, या सर्व घटनांमागील कारण तपासण्यावर आम्ही भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांनी रेल्वे मंत्रालयाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधणार असल्याचे सांगितले.
गुरुवारची घटना रेल्वेरुळाला तडा गेल्याने घडली आहे. या घटनेमागे रेल्वेरुळ बनवण्यासाठी वापरलेल्या घटकांमधील दोषांचाही संबंध आहे. रुळ बांधणीत वापरलेले पोलाद योग्य होते का, याची चाचणी आता आम्ही करणार आहोत. मात्र या घटनेमागे देखभाल-दुरुस्तीमधील हलगर्जी हे कारण नक्कीच नाही.
– ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद     (महाव्यवस्थापक)