‘येणार येणार’ म्हणून गेले काही महिने चर्चेत असलेल्या नवीन एटीव्हीएम यंत्रांना आता अखेर येत्या वर्षांअखेरचा मुहूर्त मिळणार आहे. ही यंत्रे विकत घेण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून येत्या दीड महिन्यात एकूण २८८ यंत्रांपैकी काही यंत्रे येणार आहेत. ही यंत्रे मध्य रेल्वेच्या कोणकोणत्या स्थानकांवर बसवली जातील, याचा सर्व आराखडा तयार आहे. त्यामुळे नवीन वर्षांच्या सुरुवातीपासूनच तिकिटासाठी खिडकीपुढे उभे राहण्याचे मध्य रेल्वेवरील प्रवाशांचे कष्ट वाचणार आहेत. या २८८ यंत्रांपैकी ९८ यंत्रे सध्या बिघडलेल्या यंत्रांच्या जागी बसवली जातील.
मध्य रेल्वेवर सध्या ३८२ एटीव्हीएम यंत्रे आहेत. यापैकी ९८ यंत्रे बंद पडलेली आहेत. या ९८ यंत्रांपैकीही ८४ यंत्रांची नासधूस झाली असून १४ यंत्रे कालबाह्य झाली आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेवर एटीव्हीएम यंत्रांचा तुटवडा भासत होता. या यंत्रांसाठीची निविदा प्रक्रिया पुढील ४५ दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र सर्व यंत्रे मध्य रेल्वेवर येण्यासाठी डिसेंबर अखेपर्यंतचा कालावधी जाईल, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. आलोक बडकुल यांनी सांगितले. ही यंत्रे बसवण्यासाठी आम्ही स्थानकांचा अभ्यास केला आहे. सध्या एटीव्हीएमचा जास्तीत जास्त वापर होणारी स्थानके, लोकसंख्या आणि तिकीट खप वाढलेली स्थानके असा विचार करूनच याबाबत निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.