वक्तशीरपणासाठी ख्याती असलेल्या पश्चिम रेल्वेमार्गाला सध्या मध्य रेल्वेचा गुण नाही, पण वाण लागला आहे. चर्चगेट-अंधेरी या अध्र्या तासाच्या प्रवासासाठी जलद मार्गावरील गाडय़ांना सध्या ५० ते ५५ मिनिटे लागत आहेत.
  पश्चिम रेल्वेवर सध्या दादर ते अंधेरी या स्थानकांदरम्यान रुळांवर देखभाल दुरुस्तीचे काम चालू असल्याने ही दिरंगाई होत असल्याचे काही अधिकारी खासगीत कबूल करत असले, तरी काहींच्या मते सारे काही आलबेल आहे. कोणत्याही गोंधळाबाबत प्रवाशांना अंधारात ठेवण्याची ही पश्चिम रेल्वेची नेहमीचीच रीत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून डाउन जलद मार्गावरील गाडय़ा अंधेरीपर्यंत पोहोचण्यासाठी ५० ते ५५ मिनिटे घेत आहेत. वास्तविक हे अंतर अध्र्या तासात कापले जाते. विशेष म्हणजे दादर ते अंधेरी या दरम्यान गाडय़ा रखडत चालल्याच्या तक्रारी प्रवाशांनी वारंवार केल्या आहेत. मात्र याबाबत पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेंद्रकुमार यांना विचारले असता, सर्व गाडय़ा वेळेत चालत असून या तक्रारींमध्ये काही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.