गेल्या चार आठवडय़ांपासून सुरू असलेल्या लोकसत्ता लोकांकिकेच्या नाटय़जागराचा अखेरचा अंक गाजविला तो पुण्याच्या आय. एल. एस. विधी महाविद्यालयाच्या ‘चिठ्ठी’ने. प्रौढ साक्षरतेबद्दल नर्मविनोदी शैलीत खुसखुशीत भाष्य करणारी ही एकांकिका महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ ठरली. सवरेत्कृष्ट एकांकिकेसह पाच पारितोषिके पटकावून या एकांकिकेने स्पर्धेवर आपली मोहोर उमटवतानाच प्रेक्षकांचीही मने जिंकली.  
प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदीरात ‘हाऊसफुल’ प्रेक्षागाराच्या साक्षीने रंगलेली महाअंतिम फेरी सर्वार्थाने संस्मरणीय ठरली. राज्यभरातील आठ केंद्रांतून आणि तब्बल १०६ एकांकिकांतून तज्ञ परिक्षकांनी निवडलेल्या आठ एकांकिकांनी उपस्थित रसिकांना निव्वळ कलात्मक अनुभवच दिला असे नाही, तर मराठी मातीतील सर्जनशील तरूणाईच्या रसरशीत उर्जेचा प्रत्ययही दिला.
सिग्मंड फ्रॉईड यांच्या तत्वज्ञानावर आधारित वैचारिक प्रबोधन करणाऱ्या, चिपळूण येथील डी. बी. जे. महाविद्यालयाच्या ‘कबूल है’ या एकांकिकाने द्वितीय तर मुंबईच्या एम. एल. डहाणूकर महाविद्यालयाच्या ‘बिंईग सेल्फीश’ या नात्यांतील दुराव्यावर मार्मिक भाष्य करणाऱ्या एकांकिकेने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. रंगभूमीचे चालतेबोलते विद्यापीठ असलेल्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांच्या उपस्थितीत या स्पर्धेतील विजेत्यांना गौरवण्यात आले.
कसदार अभिनय, ताकदीच्या संहिता आणि उकृष्ट नेपथ्याचा अविष्कार घडवित शनिवारी दिवसभर राज्यभरातून सादर झालेल्या आठ एकांकिकांनी नाटय़वेडय़ा रसिकांनाच नव्हे, तर नाटय़-चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनाही खिळवून ठेवले. गौतम बुद्ध, सिग्मंड फ्रॉईड, बंडखोर लेखक सआदत हसन मंटो यांच्यासारख्या विचारवंतांच्या भूमिकांना, तत्वज्ञानाला स्पर्शून जाणारा नीतळ तरल अनुभव यावेळी सळसळत्या तरुणाईने उपस्थितांना दिला. नर्मविनोदी शैलीत अत्यंत खुमासदाररीत्या पती-पत्नीतील संशयकल्लोळ सादर करत प्रौढ साक्षरतेची सहजसोपी मांडणी करणाऱ्या ‘चिठ्ठी’ने यावेळी उपस्थितांची मन जिंकली तर, ठाणे केंद्रातून अंतिम फेरीमध्ये स्थान पटकावलेल्या ‘मडवॉक’ या बुद्धाचे तत्वज्ञान उलगडणाऱ्या एकांकिकेने रसिकांना अंतर्मुख केले. ‘जुने होण्यात नव्हे, तर प्राचीन होण्यात मजा आहे,’ असा संदेश सहजसोप्या शैलीत देणाऱ्या या एकांकिेकेत बेंजामिन हे प्रमुख पात्र साकारणारा अभिजीत पवार याने सवरेकृष्ट अभिनयाचे पारितोषिक पटकावले. याशिवाय अर्पिता घोघरदरे (पात्र : मनिषा – चिठ्ठी) आणि ओंकार भोजने (फ्रॉइड : कबूल है) या दोन तरुण कलावंतांनीही उकृष्ट अभिनयाची पारितोषिक पटकावली.
सॉफ्ट कॉर्नरची प्रस्तुती असलेल्या आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने पार पडलेल्या या बहारदार स्पर्धेला ‘अस्तित्व’ या संस्थेचे सहाय्य, तर ‘झी मराठी नक्षत्र’ यांचे इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजकत्व लाभले. पुढील वर्षी ही स्पर्धा ऑक्टोबरमध्येच होणार असल्याची घोषणा यावेळी ‘लोकसत्ता’चे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी केली.
(‘लोकसत्ता लोकांकिका’चा सविस्तर आणि सचित्र वृत्तान्त मंगळवारच्या अंकात)
*सर्वोत्कृष्ट एकांकिका-प्रथम : चिठ्ठी (आय. एल. एस. विधी महाविद्यालय पुणे)
*सर्वोत्कृष्ट एकांकिका-द्वितीय : कबुल है (डी. बी. जे. महाविद्यालय चिपळूण)
*सर्वोत्कृष्ट एकांकिका-तृतीय : बिंईग सेल्फीश (एम. एल. डहाणूकर महाविद्यालय, मुंबई)
*सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : अपुर्वा भिलारे (चिठ्ठीे)
*सर्वोत्कृष्ट लेखक : ओंकार भोजने (कबूल है)
*सर्वोत्कृष्ट अभिनय : अर्पिता घोगरदरे (चिठ्ठी), ओंकार भोजने (कबूल है), अभिजीत पवार (मडवॉक, सीएचएम महाविद्यालय, उल्हासनगर)
*सर्वोत्कृष्ट नेपथ्य : रेणूका जोशी (चिठ्ठी)
*सर्वोत्कृष्ट संगीत : भरत जाधव (मसणातलं सोनं) नृत्य विभाग, मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद
*सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : नृपाल डिंगणकर(चिठ्ठी)

नाटय़कलेकडे गंभीरपणे पाहायला हवे..
आता जगभरातील प्रेक्षक अधिक प्रगल्भ झाला आहे.पूर्वीसारखी दोन-अडीच तासांची नाटके हळूहळू कालबाह्य़ होतील. इतरत्र आता सत्तर-ऐंशी मिनिटांचीच नाटके होतात. त्यामुळे नॅनो आणि मायक्रोच्या जमान्यात आपल्याकडच्या एकांकिका हेच भविष्यकाळातील नाटक असणार आहे. परिणामी नाटय़कलेकडे अधिक गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. आपण जे सादर करणार आहोत, त्याच्याशी कलावंतांनी प्रामाणिक असायला हवे. परीक्षक अथवा प्रेक्षक यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी गिमिक करणे सोडून नाटय़ानुभवाशी प्रामाणिक राहिले तर ते अधिक चांगले होईल. त्यासाठी जुने ग्रामर आणि नियम तोडायला शिकले पाहिजे. – शफाअत खान (लेखक)

एकांकिकांसाठी सशक्त व्यासपीठ..
या स्पर्धेच्या निमित्ताने समग्र महाराष्ट्राचे प्रातिनिधिक चित्र दिसले. ठिकठिकाणचे युवक कसे विचार करतात हे समजले. अभिव्यक्तीशी प्रामाणिक राहून विविध प्रकारे विचार मांडता येतात, हे या सादरीकरणातून दिसले. महाराष्ट्रात प्रायोगिक नाटकांसाठी फारशा संस्था नाहीत. या स्पर्धेच्या निमित्ताने निवडक २५-३० रंगकर्मीसाठी ‘लोकसत्ता’ने विशेष प्रशिक्षण आयोजित करावे. – चंद्रकांत कुलकर्णी (दिग्दर्शक)