मुंबई आणि हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात ‘बॉलीवूड’ यांचे अतूट असे नाते आहे. मुंबई शहर हे भारताची आर्थिक राजधानी म्हणून जसे ओळखले जाते तसेच ते ‘बॉलीवूड’चे मुख्य केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. ‘बॉलिवूड’चे महत्त्व लक्षात घेऊन एशियाटिक सोसायटी-मुंबई आणि मुंबई रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते ३० मार्च या कालावधीत ‘सिनेमा अ‍ॅण्ड सिटी’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाअंतर्गत व्याख्याने, चर्चासत्र, प्रदर्शन, मुलाखती असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हस्ते एशियाटिक सोसायटीच्या दरबार हॉलमध्ये २० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या वेळी सुधीर पटवर्धन, सई परांजपे, खलिल मोहंमद, पिया बेनेगेल आदी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने ‘सिनेमा अ‍ॅण्ड सिटी-व्हिन्टेज एरा’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राजन जयकर, प्रकाश जोशी आणि अरुण पुराणिक यांच्या संकल्पनेतून साकार झालेले हे प्रदर्शन सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वासाठी खुले आहे.  २० मार्च रोजी श्याम बेनेगल यांच्यावर तयार करण्यात आलेला ‘द मास्टर श्याम बेनेगल’ हा लघुचित्रपट दाखविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत होणारी व्याख्याने दररोज सायंकाळी सहा वाजता एशियाटिक सोसायटीच्या दरबार हॉलमध्ये होतील. त्यासाठी विनाशुल्क प्रवेश आहे. अधिक माहितीसाठी बिराज मेहता (९८२०४९६५६३) किंवा रफिक (९९६७८०८१०८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.