धर्मावर आधारित राजकारण आणि खोटी आश्वासने यामुळे देशातील जनतेने भाजपला नाकारायला सुरुवात केली असून, बिहारचा निकाल हे त्याचेच उदाहरण आहे. बिहारचा विजय हा देशातील परिवर्तनाची नांदी आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिली आहे.

बिहारची जनता विचाराने श्रीमंत आहे. त्यांनी देशाला नवी दिशा दाखवली त्याबद्दल बिहारच्या जनतेचे मन:पूर्वक आभार. दिल्लीपाठोपाठ आता बिहारमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. देशात पसरलेली असहिष्णुता, धर्मावर आधारित राजकारण व खोटी आश्वासने यामुळे देशातील जनतेने भाजपला नाकारायला सुरुवात केली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. देशाच्या राजकारणात बिहारच्या निवडणुकीनंतर भाजपविरोधी वातावरण निर्माण झाल्याचेही पवार यांनी सांगितले.
तर बिहारमधील महाआघाडीचा विजय ही देशातील राजकीय परिवर्तनाची नांदी असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. या निवडणुकीत भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा वापरला. त्यामुळे बिहारमधील पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या दीड वर्षांत दिल्लीपाठोपाठ बिहारच्या जनतेनेही नरेंद्र मोदींच्या धोरणांना नाकारले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात असलेले वातावरणही वेगाने बदलत असल्याचेही त्यांनी सांगितले.