सरकार वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतल्याने अडचणीत सापडलेल्या भाजपने अखेर सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेचा  दरवाजा ठोठावला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’निवासस्थानी भाजप नेते चर्चेसाठी आज शुक्रवारी जाणार आहेत, मात्र आतापर्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याने शिवसेनाही धोबीपछाड देण्याच्या तयारीत आहे. अध्यक्ष अमित शहा हे शनिवारी मुंबईत येत असूनही त्यांची ठाकरे यांच्याशी भेट ठरलेली नाही. भाजप झुलविण्यासाठीच चर्चेचा देखावा करीत असल्याची शिवसेनेची भावना आहेत. उद्धव हेसुद्धा सत्तेत सहभागी होण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
शिवसेना सत्तेत येण्यासाठी लाचार आहे, असे चित्र निर्माण करीत ‘आम्ही देऊ तेवढी मंत्रिपदे व खाती शिवसेनेने स्वीकारली पाहिजेत,’ या पद्धतीने भाजपने शिवसेनेला झुलविले. त्यामुळे ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील बहुसंख्य नेते कमालीचे नाराज आहेत. विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेऊन शिवसेनेने दुष्काळासह अनेक बाबींवर आक्रमक भूमिका घेतली.
राष्ट्रवादीचा अप्रत्यक्ष पाठिंबा घेतल्याने आणि शिवसेनेला झुलविल्याने निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी तसेच सरकार स्थिर ठेवण्यासाठी अखेर शिवसेनेशी बोलणी सुरू करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. ठाकरे यांच्या अडवणुकीच्या भूमिकेचा भाजपला बराच त्रास झाला आहे आणि उपमुख्यमंत्री पदासह गृहखाते व अन्य महत्त्वाची खाती शिवसेनेला द्यायची तयारी नाही. पण जनमानसात निर्माण झालेली भाजपविरोधातील नाराजी दूर करण्यासाठी आणि शिवसेनेशी चर्चाच केली नाही, असे चित्र निर्माण होऊ नये, यासाठी भाजप नेते आता चर्चा करीत असल्याचे शिवसेनेला वाटत आहे.
शिवसेनेला बरोबर घेण्याची भूमिका होती, तर आधी बदनामी करून एवढा उशीर लावण्याची काय गरज होती, असे ज्येष्ठ शिवसेना नेत्यांना वाटत आहे.
 राष्ट्रवादी काँग्रेसवर भरवसा ठेवून सरकार अस्थिर ठेवण्यापेक्षा आता शिवसेनेला सोबत घेण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेचा सन्मान ठेवण्यासाठी भाजप सत्तेत किती वाटा देणार आहे, याचा नेमका प्रस्ताव काय आहे, हे शिवसेना जाणून घेणार आहे.
भाजपचा प्रस्ताव पाहून शिवसेना विचार करून निर्णय घेईल, असे सांगून भाजपच्या नेत्यांची बोळवण केली जाणार आहे. अमित शहा यांच्याशी मुंबई भेटीत चर्चा झाली, तरच मार्ग निघू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्याशी मी दूरध्वनीवरून बोललो असून शिवसेना सत्तेत सहभागी होईल. शिवसेनेशी शुक्रवारपासून बोलणी सुरू होणार आहेत. भाजपकडून केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान आणि राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील हे ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन ठाकरे यांच्याशी चर्चा करतील.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री