मेट्रोच्या वादात व्यवहार्य विचार करा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शिवसेनेला कानपिचक्या

मुख्यमंत्री पदावरून निवृत्त झाल्यानंतर मी नागपूरलाच राहणार आहे. खरे म्हणजे, मुंबईचा विकास कसा करायचा, हे ‘मूळ मुंबईकरांनी’ ठरवावे, अशा कानपिचक्या शिवसेनेला देत आणि विरोधकांना चुचकारत, ‘नागपूरकर व्यक्तीने मुंबईचा विकास केल्याचे दाखवून देईन,’ असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केला. आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडची जागा बदलल्यास दीड हजार कोटी रुपयांनी खर्च वाढून त्याचा भरुदड प्रवाशांवरच तिकीट दरवाढीतून पडेल, असे  सुनावतानाच, ‘व्यवहार्य विचार करा’ असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षाचा उल्लेख टाळून दिला. मेट्रोसाठी महापालिकेच्या परवानगीची गरजच नाही, असा टोला लगावत, मेट्रो प्रकल्प होणारच, अशी ग्वाही त्यांनी मुंबईकरांना दिली.

नगरविकास, गृह, विधी व न्याय खात्यांच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना  खडे बोल सुनावले. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आरे कॉलनीतील ३००-३५० झाडे तोडायची नाहीत, ही विरोधकांची भूमिका आहे. पण त्यातील काही स्थलांतरित करून साडेतीन हजार झाडे लावली जातील. पर्यावरण रक्षणासाठी कार्बनचे हवेतील प्रमाण नियंत्रित राखणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वजनिक वाहतुकीला अधिकाधिक प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यादृष्टीने महानगरातील वाहतुकीसाठी मेट्रो हा सर्वोत्तम पर्याय असून तिला पाठिंबा दिल्यानेच पर्यावरणाचे संरक्षण होईल, असा युक्तिवाद मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.  मेट्रो विरोधकांना सुनावताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या निवृत्तीचा उल्लेख केल्याने त्यांना इतक्यातच निवृत्तीचे वेध कसे लागले, अशी चर्चा सुरू झाली.  पण ‘मी एवढय़ात काही जात नाही, पुढील सत्ताही आमचीच असेल’, असा दावा फडणवीस यांनी केला. मी नागपूरचा असून निवृत्तीनंतर नागपूरलाच जाईन. पण नागपूरच्या व्यक्तीने मुंबईवर तेवढेच प्रेम केले, हे दाखवून देईन, असा टोला लगावत, मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ हे दोन टप्पे २०१९ मध्ये निश्चितच पूर्ण होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहरातील वाहतुकीची समस्या बिकट होत असून आपल्या शहराला पुढे कसे न्यायचे, हा विचार ‘मूळ मुंबईकर’ असलेल्यांनी केला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले आणि हा प्रकल्प कसा फायदेशीर आहे, याविषयी तपशील दिले.  ‘मेट्रो’ हा विशेष प्रकल्प असल्याने त्याला महापालिकेच्या परवानगीची गरजच नाही. महापालिकेचे म्हणणे काय आहे, हे ऐकून घेऊ. हुतात्मा स्मारक काढावे लागणार नाही, तो केवळ गैरसमज असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले..

  • स्मार्ट सिटीसाठी ८ शहरांना राज्य सरकार निधी देणार
  •  शिर्डी येथील पोलिस कोठडीतील मृत्यूची चौकशीचे आदेश, तिघे निलंबित, प्रभारी अधिकाऱ्याची बदली
  • मी ‘ओव्हरटाईम’ करणारा मुख्यमंत्री, फुलटाईम वेगळा नको