युती आणि आघाडीतील फुटीचे खापर फोडण्यावरून शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सुरू झालेला संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. युती तुटण्यास कारणीभूत असलेल्या भाजपच्या नेत्यांचा पराभव करा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे. ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आपल्या कंपूत सामील करून तेथे भाजपला नामोहरम करण्याची योजनाही शिवसेनेने आखली आहे. तर दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीत जोरदार शह-काटशह सुरू आहे.
शिवसेनेसोबतची २५ वर्षांची युती संपल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेन्द्र फडणवीस, भाजप नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांनी जाहीर केले होते. भाजपने ही युती का तोडली, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यातील प्रचार सभांमधून करू लागले असून, ‘युती तोडणाऱ्या नेत्यांचा पराभव करा’ असे आदेशच ‘मातोश्री’वरून जारी झाले आहेत. प्रचार सभांदरम्यान शिवसेनेवर कोणतीही टीका करावयाची नाही असे भाजपने जाहीर केले असले, तरी उद्धव यांच्या या सवालांमुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे आता भाजपही सेनेवर हल्लाबोल करणार, अशी चर्चा सुरू आहे.
दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील चढाओढही शिगेला पोहोचली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड दक्षिण मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र यादव यांनी बुधवारी माघार घेत चव्हाणांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे राष्ट्रवादीवर नामुष्कीची वेळ आली. यादव हे राष्ट्रवादीचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक असून उदयनराजे आणि अजित पवार यांच्यात तीव्र मतभेद आहेत. त्यामुळेच यादव यांनी माघार घेतल्याचे बोलले जात आहे. यादव यांना आपल्याकडे वळवून चव्हाण यांनी राष्ट्रवादीला शह दिला. मात्र, राष्ट्रवादीनेही लगेचच या मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विलासकाका पाटील उंडाळकर यांना पाठिंबा जाहीर करून चव्हाणांपुढील आव्हान कायम ठेवले.  
ठाण्यातही सेनेची व्यूहरचना
डोंबिवली, मुरबाड, विक्रमगड या भाजपची ताकद असलेल्या मतदारसंघात भाजप उमेदवारांच्या पराभवासाठी शिवसेनेने व्यूहरचना आखली असून येथील भाजप पदाधिकाऱ्यांना तसेच ‘संघ’निष्ठांना आपलेसे करण्याची मोहीमच सेनेच्या स्थानिक नेत्यांनी आखली आहे.
जयंत पाटलांची कोंडी
सांगलीत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांची राजकीय कोंडी करण्यासाठी एकास एक उमेदवार देण्याचे विरोधकांचे प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी ठरले आहेत. शिवसेनेचे भीमराव माने आणि प्रमुख विरोधक अपक्ष नानासाहेब महाडिक यांनी बुधवारी माघार घेतली. पाटील यांच्या विरुद्ध पाच प्रमुख उमेदवारांसह १३ जण िरगणात उरले आहेत. जयंत पाटील यांचा जिल्ह्य़ातील अन्य मतदार संघांमध्ये होणारा हस्तक्षेप टाळण्यासाठी त्यांना त्यांच्याच इस्लामपूर मतदार संघामध्ये कडवे आव्हान देण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू होते. यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि खा. राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला होता.