काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागावाटपावरून ताणले गेले असतानाच राष्ट्रवादीच्या ताब्यातील ११४ मतदारसंघांत उमेदवारांची नावे निश्चित करून काँग्रेसने सर्व जागा स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण केली आहे.
काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत छाननी समितीची बैठक झाली. पक्षाने गेल्या वेळी लढलेल्या १७४ मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जवळपास निश्चित केली आहेत. काँग्रेसचा १२४ जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादीने फेटाळल्यावर काँग्रेसचे नेते सावध झाले. त्यातच राष्ट्रवादीने सर्व पर्याय खुले असल्याचा इशारा दिल्याने काँग्रेसने उर्वरित ११४ मतदारसंघांतील उमेदवारांची नावे निश्चित केली. आघाडी तुटल्यास शेवटच्या क्षणी धावाधाव नको म्हणून काँग्रेसने सावधगिरी बाळगली आहे. ११४ मतदारसंघांतील संभाव्य नावांची शिफारस सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील निवडणूक समितीला करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीला सूचक इशारा देण्याकरिताच काँग्रेसने हे पाऊल उचलल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीच्या दबावाला बळी पडायचे नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
सर्व आमदारांना उमेदवारी नाही
पक्षाच्या बहुतांशी सर्व विद्यमान आमदारांना फेरउमेदवारी देण्याची शिफारस राज्य संसदीय मंडळाने केली होती. सरकारच्या विरोधातील नाराजी कमी करण्याकरिता उमेदवारी देताना नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी सूचना पक्षश्रेष्ठींनी केली आहे. परिणामी सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही. सर्व आमदारांना पुन्हा उमेदवारी दिल्यास त्याचा फटका बसू शकतो. यातूनच गेली पाच वर्षे कामगिरी फारशी समाधानाकारक नसलेल्या आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही, असे सांगण्यात आले. पक्षाच्या सर्व विद्यमान मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. पहिली यादी उद्या जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.