शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कवरच व्हावे, यासाठी कायदा हातात घेण्याच्या शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या वक्तव्याने या प्रकरणाला आता वेगळेच वळण लाभले आहे. कायदा हातात घेण्याची कोणी भाषा केल्यास सरकार कारवाई करेल, असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला तर लोकसभेचे अध्यक्षपद भूषविलेल्यांकडून अशा विधानांची अपेक्षा नाही, अशी टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली आहे. तर, जोशी यांनी केलेले वक्तव्य प्रक्षोभक आहे का, हे तपासण्याच्या सूचना सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावे, अशी मागणी बाळासाहेबांच्या निधनानंतर लगेचच मनोहर जोशी यांनीच सर्वप्रथम केली, तेव्हापासून बाळासाहेबांच्या स्मारकाचा नवा वाद मुंबईत उफाळला आहे. त्यातच रविवारी नाशिकमध्ये बोलताना जोशी यांनी या मागणीचा पुनरुच्चार करताना ‘कायदा हातात घ्या’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जोशी यांचे नाव न घेता टीका केली. सरकार कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही. वेळ प्रसंगी योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. तर, शिवसेनाप्रमुखांचे स्मारक हा संवेदनशील विषय आहे. त्यावर सर्व नेत्यांनी एकत्र बसून त्यावर तोडगा काढावा, असे मत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केले. जोशी यांचे नाशिकमधील वक्तव्य तपासून पाहण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
लोकसभेचे अध्यक्षपद भूषविलेल्या व्यक्तीकडून असे वक्तव्य अपेक्षित नाही, असा टोलाही प्रदेश काँग्रेसने मारला असून, त्यांच्या मालकीच्या कोहिनूर मिलच्या जमिनीवर स्मारक व्हावे, या मागणीला बगल देण्यासाठीच ते शिवाजी पार्कसाठी आग्रही आहेत, अशी कोपरखळीही मारली आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाच्या मुद्दय़ाचे राजकारण सुरू झाले आहे, असा आरोपही प्रदेश काँग्रेसने केला आहे.