डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीवर ताबा कुणाचा, यावरून सुरु झालेल्या न्यायालयीन लढाईत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील नियामक मंडळाला कारभार पाहण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिल्याची माहिती त्यांचे वकील अ‍ॅड. बी.के. बर्वे यांनी दिली. परंतु भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिलाच नाही, असा दावा केला.
मुंबई उच्च न्यायालयात आठवले गटाचे गंगाधर पानतावणे व डी.जी. गांगुर्डे यांच्या सदस्यत्वाबद्दलची याचिका आहे, त्यावर तीन महिन्यात निर्णय द्यावा, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, असे आंबेडकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. शिवाय, एम.एस.मोरे व पी.एस. गायकवाड यांच्या नियामक मंडळालाच कारभार पाहण्याची परवानगी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पीपल्स सोसायटीवरील वर्चस्वावरुन प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यात वाद सुरु आहे. हा वाद रस्त्यावरुन न्यायालयात गेला. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात सोमवारी आठवले यांच्या नेतृत्वाखालील नियामक मंडळाच्या बाजूने निकाल दिल्याची माहिती अ‍ॅड. बर्वे यांनी दिली. आंबेडकर यांनी मात्र आठवले यांच्या गटाकडून चुकीची माहिती दिली जात असल्याचा दावा केला. न्यायालयाच्या निकालासंदर्भातही आंबेडकर व आठवले गटांकडून परस्परविरोधी दावे करण्यात येत आहेत.