राज्यातील शेतकऱ्यांना ३० जून २०१६ पर्यंतच्या थकबाकीसाठी कर्जमाफी जाहीर करण्यात आली असली तरी आता ३१ जुलै २०१७ पर्यंतचे मुद्दल व व्याजही माफ करण्याचा निर्णय बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याशिवाय कर्जमाफी योजनेंतर्गत वेळोवेळी जाहीर करण्यात आलेल्या निर्णयांवरही मंत्रिमंडळाने मोहर उमटवली. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. त्यात ३० जून २०१६ पर्यंत दीड लाख रुपयापर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचा समावेश आहे.  १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत पीक किंवा मध्यम मुदत कर्जाच्या थकबाकीतील परतफेड केलेल्या रकमेसंबंधीचा आजचा निर्णय आहे. ३० जून २०१६ पर्यंत थकित कर्जातील परतफेड केलेली रक्कम वगळून ३१ जुलै २०१७ पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न केलेल्या थकबाकीची दीड लाख रुपयापर्यंतची रक्कम कर्जमाफीस पात्र धरण्यात आली आहे. अशी रक्कम दीड लाख रुपयांच्या वर असेल, तर एकरकमी परतफेड योजनेनुसार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

त्याचबरोबर १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत वाटप केलेल्या पीक कर्जापैकी ३० जून २०१६ पूर्वी किंवा त्यानंतर झालेल्या पुनर्गठित कर्जाचे ३१ जुलै २०१७ पर्यंत व्याज व थकित हप्ते दीड लाख रुपयांच्या मर्यादेत असल्यास, त्याचीही कर्जमाफीच्या योजनेत समावेश करण्यात आला आहे. अशी रक्कम दीड लाख रुपयांच्या वर असल्यास एकरकमी परतफेड योजनेनुसार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. मात्र त्यासाठी दीड लाख रुपयांवरील थकित पीक कर्ज किंवा पुनर्गठित कर्जाची उर्वरित थकित रक्कम ३१ डिसेंबर पर्यंत भरणे आवश्यक आहे.

स्वयंअर्थसहाय्यित शाळा मान्यता

राज्यातील महानगरपालिका व अ वर्ग नगरपालिकांच्या क्षेत्रात किमान ५०० चौरस मीटरच्या जागेत स्वयंअर्थसहाय्यित शाळा स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी नवीन शाळांना मान्यता देणे तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांना दर्जा वाढविण्यासाठी १९ जानेवारी २०१३ पासून लागू करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ

शिर्डी येथील शिर्डी ग्रीनफिल्ड इंडरनॅशनल एअर पोर्ट या विमानतळाचे श्री. साईबाबा आंतरराराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याची शिफासर केंद्र सरकारकडे करण्याच्या प्रस्तावास  मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ऑक्टोबर २०१७ पासून साईबाबा यांच्या समाधीचे शताब्दी पर्व सुरु होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.