आरोग्य विभागाचे कार्यवाहीचे आदेश

अमरावती विद्यापीठाच्या कला शाखेच्या प्रथम वर्ष बीएच्या इतिहासाच्या पुस्तकातून पुत्रप्राप्तीबाबतची माहिती शिकविली जात आहे. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंगनिवडीस प्रतिबंध कायद्याचा (पीसीपीएनडीटी) हा सरळसरळ भंग असल्याच्या तक्रारीवरून राज्याच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक यांनी अमरावती जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठवून विद्यापीठाविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

विद्यापीठाच्या प्रथम वर्ष बीएच्या अभ्याक्रमासाठी भारताचा इतिहास या संदर्भ पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. त्यात पुत्रप्राप्तीबरोबरच, वर्णव्यवस्था व जातिव्यवस्थेचे समर्थन करणारे धडे आहेत. उच्च-नीचतेच्या तत्त्वावर आधारलेलेली जातिव्यवस्था नेस्तनाबूत झाली पाहिजे यासाठी एका बाजूला चळवळी सुरू आहेत, भारतीय राज्य घटनेनेही सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी जातिनिर्मूलन व अस्पृश्यतानिर्मूलनाचा आग्रह धरला आहे, तर दुसऱ्या बाजूला शिक्षणातूनच जातिव्यवस्था कशी योग्य आहे, याचे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील एक जागरूक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी, त्याबाबत आरोग्य सेवा अतिरिक्त संचालकांकडे लेखी तक्रार करून, विद्यापीठांवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती केली आहे.

याच पुस्तकात जातीपद्धतीचे गुण, या नावाने जातिव्यवस्थेचे समर्थन करणारा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. शेकडो वर्षांपासून भारतात जातीपद्धती विद्यामान आहे. निसर्गनियमानुसार ती टाकाऊ असती, तर केव्हाच समाजातून बाहेर फेकली गेली असती.

म्हणून विद्वानांच्या मते निश्चित या पद्धतीचे फायदे लक्षात आल्याने ती प्रचलित आहे. नव्हे बाहेरच्या जगात जातीपद्धती अस्तित्वात राहिलेली नसताना भारतात मात्र सुरू आहे.  त्यामुळे भारतीय राज्य घटनेतील समानतेच्या तत्त्वाचीही पायमल्ली होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. आरोग्य सेवा संचालकांनी या तक्रारीची दखल घेऊन, याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहेत.

मुलीच्या जन्माचे महत्त्व कमी

मुलीच्या जन्माला कमी लेखत पुत्रप्राप्तीचे उपाय सुचविणे व त्याचा प्रचार-प्रसार करणे हा पीसीपीएनडीटी कायद्याने गुन्हा ठरविला आहे. तरीही बीएच्या इतिहासाच्या पुस्तकात पुत्रप्राप्तीच्या उपायाची माहिती देऊन या कायद्याचा भंग करण्यात आला आहे. ‘संस्कार’ या शीर्षकाखाली पुसंवनविधीची माहिती देण्यात आली आहे. त्यात, पुत्रप्राप्तीसाठी करावयाचा हा एक विधी होता, असे म्हटले आहे.

जातिव्यवस्थेचे समर्थन

स्वजातीच्या अभिमानामुळेच परकीय आक्रमणांपासून भारतीय समाजाचे व संसकृतीचे रक्षण झाले आहे. जातीजातींची कडक बंधने होती. त्यांच्यात अपवाद वगळला तर परस्पर विवाहसंबंध होत नसत. यामुळे वर्णसंस्कार न होता रक्ताची शुद्धता टिकून राहण्यास फार मोठी मदत झाली, अशा प्रकारच्या उल्लेखातून जातिव्यवस्थेचे समर्थन करणारे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे.

प्रथम वर्ष बीएच्या अभ्यासक्रमासाठी भारताचा इतिहास हे पुस्तक निवडण्यात आले आहे. मात्र त्यातील पुत्रप्राप्ती किंवा जातिव्यवस्थेचे समर्थन असल्याबद्दल अद्याप विद्यापीठाकडे कोणाची तक्रार आलेली नाही, त्याचबरोबर आरोग्य विभागाकडूनही तसे काही कळविण्यात आलेले नाही, परंतु याबाबत तक्रार प्राप्त झाल्यावर, योग्य ती कार्यवाही करण्याची विद्यापीठाची तयारी आहे.  अजित देशमुख, कुलसचिव, अमरावती विद्यापीठ