अस्ताला गेलेला सूर्य आणि समुद्राच्या साक्षीने मुंबईत गुरुवारी गेट वे ऑफ इंडिया येथे ‘गौरव ज्ञानपीठ विजेत्यांचा, गौरव मराठी भाषेचा’ हा कार्यक्रम झाला आणि त्याला ज्ञानपीठाने गौरविले गेलेले भालचंद्र नेमाडे हजरही होते. नेहमी थेट आणि वादग्रस्त बोलण्याबद्दलही प्रसिद्ध असलेले नेमाडे यांनी घुमान संमेलनावर टीका केली होती. व्यासपीठावर या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हेही होते. त्यामुळे नेमाडे काय बोलणार, अशी उत्सुकता उपस्थितांना होती, पण त्यांचे केवळ ध्वनिचित्रमुद्रित भाषणच ऐकावे लागले!
राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या ज्ञानपीठ अभिमान, अभिनंदन आणि आनंद सोहळ्यात हा अनुभव आला. मराठीसाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे वि. स. खांडेकर यांच्यापासून वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि आता भालचंद्र नेमाडे या दिग्गजांच्या कार्य कर्तृत्वाचा आणि साहित्याचा आढावा नृत्य, नाटय़ आणि संगीताच्या माध्यमातून घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नेमाडे यांचा तसेच त्यांच्या पत्नीचाही सत्कार करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर डॉ. सदानंद मोरे यांच्यासह मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज आदी मान्यवर उपस्थित होते.सत्कारानंतर डॉ. नेमाडे यांच्या ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. त्यात बोलताना डॉ. नेमाडे म्हणाले की, भाषिक बंधुभाव टिकविण्यासाठी भाषा महत्त्वाची आहे. भारतासारख्या देशामध्ये जिथे असंख्य भाषा बोलल्या जातात त्या ठिकाणी भाषिक बंधुत्वाचे महत्त्व अधिक आहे. मराठी भाषेने भाषिक बंधुत्व टिकविले आहे.भाषा ही सगळ्यांची आई आहे.
मराठी भाषा सर्वच बाबतीत समृद्ध आहे. ज्ञानपीठ पुरस्कारांच्या यादीमध्ये वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज आणि विंदा यांच्या परंपरेत मीही सामील झालो. याचा मला विशेष आनंद आहे, असेही डॉ. नेमाडे यांनी सांगितले.
 अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षा व ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज, गायक व संगीतकार श्रीधर फडके आदी मान्यवर या आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते. कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची होती. तर कार्यक्रमाची संहिता, समन्वय आणि निर्मिती सहकार्य उत्तरा मोने, संगीत संयोजन आणि नेपथ्य, ध्वनी, सजावट अनुक्रमे महेश खानोलकर व नितीन चंद्रकांत देसाई यांची होती.  

‘मराठी नाटय़संस्कृती खुलविण्यात शिवाजी मंदिराचा महत्त्वाचा वाटा’
मुंबई : मराठी नाटय़संस्कृती खुलविण्यात शिवाजी मंदिर नाटय़गृहाचा वाटा मोठा असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. कानेटकर, पु.ल.देशपांडे, मच्छिंद्र कांबळे यांसारख्या नाटय़क्षेत्रातील नामवंत लोकांचे काम मराठी रसिकांपर्यंत पोहोचविण्यात या नाटय़गृहाचे मोठे योगदान असल्याचेही ते म्हणाले.  दादरमधील ‘शिवाजी मंदिर’ नाटय़गृहाने यंदा पन्नास वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने नाटय़गृहामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये पवार अध्यक्षस्थानी होते. ३ मे १९६५ रोजी ‘श्री छत्रपती शिवाजी मंडळा’ने (ट्रस्ट) शिवाजी मंदिर नाटय़गृहाची स्थापना केली. त्यानंतर हे नाटय़गृह मराठी नाटकांसाठी हक्काचे व्यासपीठ बनले. आतापर्यंत या नाटय़गृहामध्ये केवळ मराठी नाटकांनाच प्राधान्य दिल्याबद्दल पवारांनी ट्रस्टचे कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी नाटय़गृहाची आतापर्यंत कारकीर्द नाटय़संस्कृतीच्या जडणघडणीत महत्त्वाची असून यापुढेही ट्रस्टने आपले काम अखंड चालू ठेवावे, अशी आशा व्यक्त केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या नाटय़गृहाची स्थापना झाल्याचे नमूद करताना आज परिस्थिती अनुकूल असूनही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करण्याची लोकांची मानसिकता नसल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले. आज दादरसारख्या मोक्याच्या भागामध्ये अशा प्रकारचा मोकळा भूखंड उपलब्ध झाला असता, तर तेथे दुकान थाटून त्यातून किती नफा मिळविता येईल, याची गणिते मांडली गेली असती. त्यामुळे पन्नास वर्षांपूर्वी ट्रस्टने दाखविलेल्या दूरदृष्टीचे त्यांनी कौतुक केले. तसेच भविष्यात ट्रस्टला आवश्यक पायाभूत सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.