पंतप्रधानपदी निवड झाल्यापासून सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यश संपादन करण्याची किमया नरेंद्र मोदी यांनी साधली. महाराष्ट्रात त्याची पुनरावृत्ती  करण्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर राहणार आहे. कारण पुढील दोन-तीन महिन्यांत ठाणे आणि पालघर जिल्हा परिषदा, नवी मुंबई व औरंगाबाद महापालिकांच्या निवडणुका होणार असून, यात भाजपला यश मिळवून देण्यासाठी फडणवीस यांना सारी प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.
महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंड या राज्यांमध्ये भाजपला सत्ता मिळाली. जम्मू आणि काश्मिरमध्ये भाजपला आतापर्यंतचे सर्वाधिक यश मिळाले. मोदी यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यापासून सर्व निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे. भाजपची ही घौडदौड सुरू असली तरी राज्यात अशी घौडदौड सुरू ठेवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना अधिक लक्ष घालावे लागणार आहे.
अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी सर्वाधिक सात जागा तर पालघर जिल्हतील सहापैकी दोन जागा भाजपने जिंकल्या आहेत. दोन्ही जिल्हा परिषदा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याचाच भाग म्हणून अन्य पक्षांमधील ताकदवान नेत्यांना आपल्या गळाला लावण्यास भाजपने सुरूवात केली आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपची खरी कसोटी आहे. गणेश नाईक यांचा पराभव करीत भाजपच्या मंदा म्हात्रे निवडून आल्याने भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पण एवढय़ावरच महापालिका जिंकणे कठीण आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव नाईक पिता-पूत्रांना फारच जिव्हारी लागला आहे. बेलापूरमधील नव मतदारांमध्ये मोदी किंवा भाजपबद्दल आकर्षण आहे. यामुळेच भाजपमध्ये प्रवेश करून लाल दिवा डोक्यावर राहील या दृष्टीने नाईक यांची चाचपणी सुरू आहे. नाईक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. नाईक यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्यास नवी मुंबई महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलू शकतात.
मोदी यांच्याप्रमाणेच यशाची पताका कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चाचपणी सुरू केली आहे. निवडणुका जिंकण्याकरिता कोणाचा उपयोग होऊ शकतो त्या पद्धतीने सध्या माहिती जमा केली जात आहे. विधानसभा विजयानंतर पहिल्याच निवडणुकीत अपयश मिळणे भाजप किंवा फडणवीस यांना त्रासदायक ठरू शकते. यातूनच कोणत्याही परिस्थितीत निवडणुका जिंकयाच्याच या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.