महाराष्ट्रातील नाटय़वेडय़ा तरुणाईला नवे अवकाश मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीच्या नाट्यजागराला शनिवारी सकाळी प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद, एकामागोमाग सादर होत असलेले एकांकिकांचे तगडे सादरीकरण यांच्यामुळे वातावरणाला मोठी रंगत चढली आहे. आतापर्यंत ‘बिइंग सेल्फिश’ (मुंबई), ‘हे राम’ (नाशिक) ‘कोंडवाडा’ (अहमदनगर) या एकांकिकांचे सादरीकरण झाले असून उर्वरीत एकांकिका कशा असतील, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
 सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा परमोच्च बिंदू असेल रंगभूमीवरील एक चालतेबोलते विद्यापीठ अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे स्पर्धक नाटय़वेडय़ा तरुणांसमोरील मार्गदर्शनपर भाषण. top01राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हेदेखील या महाअंतिम फेरीसाठी उपस्थित आहेत. राज्यभरातील शंभराहून अधिक महाविद्यालये पिंजून काढणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या लोकांकिका या स्पर्धेत एकूण १०६ एकांकिका सादर झाल्या. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी, अहमदनगर आणि नागपूर या आठ झालेल्या अंतिम फेऱ्यांमधून ‘बिइंग सेल्फिश’ (मुंबई), ‘हे राम’ (नाशिक), ‘मडवॉक’ (ठाणे), ‘कोंडवाडा’ (अहमदनगर), ‘मसणातलं सोनं’ (औरंगाबाद), ‘कबुल है’ (रत्नागिरी), ‘चिठ्ठी’ (पुणे) आणि ‘बोल मंटो’ (नागपूर) या आठ एकांकिका महाअंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या. महाअंतिम फेरीसाठी ज्येष्ठ नाटककार शफाअत खान, दिग्दर्शक विजय केंकरे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी-मोकाशी हे दिग्गज परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. या स्पर्धेसाठी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘केसरी टुर्स’ आणि ‘इंडियन ऑइल’ यांची मोलाची मदत मिळाली. ‘अस्तित्व’ या संस्थेच्या सहकार्याने पार पडणाऱ्या या स्पर्धेचे इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजकत्व ‘झी मराठी नक्षत्र’ यांचे आहे. ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे या स्पर्धेत ‘टॅलेंट सर्च पार्टनर’ आहेत. या महाअंतिम फेरीचे साक्षीदार होण्यासाठी आणि स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मराठी मनोरंजनसृष्टीतील मान्यवर कलाकारही उपस्थित आहेत.