गंभीर आजारानंतरही उपचार नसल्याने मृत्यू झाल्याचा प्राणीप्रेमींचा आरोप

गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये एका जाहिरातीच्या चित्रीकरणावेळी शुक्रवारी सायंकाळी ‘रूपकली’ या ३३ वर्षीय हत्तिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या हत्तिणीचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे मानले जात असले तरी गेल्या तीन वर्षांपासून ती गंभीर रोगांनी आजारी असल्याची बाब समोर आली आहे. त्वचारोग, गंभीर रोगांचे संसर्ग तसेच अंगावर गाठी आदी स्वरूपाचे आजार झाल्याने ही हत्तीण बेजार होती. त्यावर मालकाने नीट उपचार न केल्याने हत्तिणीचा मृत्यू झाल्याचे प्राणीप्रेमी संघटनांचे म्हणणे असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दहिसर येथे राहणारे सबा शंकर पांडे यांच्याकडे लक्ष्मी (२८) व रूपकली (३३) अशा दोन हत्तिणींना बाळगण्याची प्रमाणपत्रे असून ही प्रमाणपत्रे त्यांना बिहारच्या वन विभागाने मंजूर केली आहेत. मात्र पांडे या दोन्ही हत्तिणींची काळजी नीट घेत नसल्याची तक्रार २०१३ मध्ये मुंबईतील ‘पॉज’ या प्राणीमित्र संघटनेने ठाणे वन विभागाकडे केली होती.

या तक्रारीवरून ठाणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या हत्तिणींची समक्ष जाऊन तपासणी केली असता त्यांना या हत्तिणींच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली होती. या हत्तिणींना त्वचेचे, तसेच अन्य गंभीर प्राणीजन्य रोग झाले असून त्यांचे मालक त्यांची नीट काळजी घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका असून आपण मालकांना हत्ती बाळगण्याचे दिलेले प्रमाणपत्र रद्द करावे, अशा आशयाचे पत्र बिहारच्या मुख्य वन विभाग अधिकाऱ्यांना ३० जुलै २०१३ साली पाठवले होते.

दोषी आढळल्यास मालकावर कारवाई

या हत्तिणीचे शवविच्छेदन झाले आहे. या प्रकरणाची आम्ही सखोल चौकशी करणार असून, मालक दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुख्य वन विभाग अधिकारी आणि कांदळवने संरक्षण विभागाचे प्रमुख एन. वासुदेवन यांनी सांगितले.

दरम्यान, रूपकली हत्तीणीचे शव विच्छेदन हे संजय गांधी उद्यानातील पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे आणि बॉम्बे पशू वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकाने केले. यात हत्तीणीच्या यकृतात खडे झाले होते. असे प्राथमिक पाहिणीत दिसून आल्याचे डॉ. पेठे यांनी सांगितले.