पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्यामुळे ‘चकमक’फेम म्हणून नावारुपास आलेला सहायक निरीक्षक दया नायक याला राज्याच्या पोलीस महासंचालकांनी निलंबित केले आहे. नागपूर येथे बदली होऊनही तब्बल दीड वर्षे रुजू न झालेल्या नायक यांना दोन वेळा नोटिसा देण्यात आल्या. परंतु त्याला दाद न देणाऱ्या नायक यांच्या  निलंबनाचे आदेश गुरुवारी जारी करण्यात आले.
पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून जुहू पोलीस ठाण्यात रुजू झाल्यानंतर नायक हे प्रदीप शर्मा यांच्या पथकात आले. शर्मा यांच्यासमवेत अनेक चकमकींमध्ये त्यांनी भाग घेतला. यामुळे शर्मा यांच्यासोबत दया नायक हेही चकमकफेम म्हणून ओळखले जाऊ लागले. शर्मा यांच्यापेक्षा त्यांच्या नावाचीच अधिक चर्चा होती. सिनेसृष्टीतील मंडळींशी त्यांची जवळीक होती. कार्यालयातील टेबलवर दोन पिस्तुले ठेवून बसणारे नायक त्यावेळी चर्चेचा विषय झाला होता. परंतु शर्मा यांच्या पथकातून दूर झाल्यानंतर फारशा चकमकीत त्यांनी भाग घेतला नाही.
या काळात त्यांची कांदिवली पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली. याच काळात मंगळूर येथे आईच्या नावे एक कोटींची शाळा बांधणे तसेच इतर कारणांमुळे त्यांच्याविरुद्धआरोप होऊ लागले. अखेरीस बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. या प्रकरणात त्यांना अटकही झाली. मात्र त्यांची नंतर या आरोपातून निर्दोष सुटकाही झाली. त्यामुळे ते पोलीस दलात रुजू झाले. त्यांची बदली नागपूर येथे करण्यात आली. मात्र तेथे रुजू होण्याऐवजी बदली रद्द होण्यासाठी ते जोरदार प्रयत्न करीत होते.
दोनवेळा नोटिसा पाठवूनही टाळाटाळ
बदली झालेल्या ठिकाणी त्यांनी नियुक्त व्हावे यासाठी त्यांच्यावर दोनवेळा नोटिसाही बजावण्यात आल्या. परंतु याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी गैरहजर राहणेच पसंत केले. त्यामुळे अखेरीस महासंचालक संजीव दयाळ यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. दयाळ यांनी त्यास दुजोरा दिला. दरम्यान, २५ जून रोजी नायक यांची राज्य सरकारने मुंबईत बदली केली होती. त्याबबातचे पत्र महासंचालक कार्यालय तसेच मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवले होते.
सुरक्षेच्या कारणास्तव आपण नागपूरला जाऊ शकत नाही, त्यामुळे आपली मुंबईत बदली करावी असा अर्ज शासनाकडे केला होता, असे कळते.