सुप्रसिद्ध वास्तुरचनाकार आणि लेखक फिरोझ रानडे यांचे प्रदीर्घ आजाराने शनिवारी रात्री निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी व लेखिका प्रतिभा रानडे, दिग्दर्शक मुलगा सौमित्र रानडे आणि स्नुषा व लेखिका रश्मी रानडे असा परिवार आहे. ‘मुंबईतली प्रार्थनास्थळे’, ‘महिमा मुंबईचा’, ‘इमारत’ यांसारखी वास्तुविषयक पुस्तके, ‘फिरविले अनंते’, ‘काबूलनामा’, ‘बारा जुलै ते अकरा जुलै’  अशी त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मराठी ग्रंथलेखनाबरोबरच फिरोझ रानडे आणि रश्मी रानडे यांनी एकत्रितपणे लिहिलेले ‘राष्ट्रपती भवन : ए पॅलेस इन ए डेमोक्रसी’ हे राष्ट्रपती भवन या वास्तुची समग्र माहिती देणारे इंग्रजी पुस्तकही प्रकाशित झाले आहे.
सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून पदवी घेतल्यानंतर ते केंद्र सरकारतच्या बांधकाम मंत्रालयात कनिष्ठ कमान कलाकार या पदावर १९५४ साली रूजू झाले. आर्किटेक्ट या इंग्रजी शब्दाला कमान कलाकार हा मराठी प्रतिशब्द फिरोझ रानडे यांनी रूढ केला. दिल्ली, कोलकाता, इम्फाळ, काबूलला केंद्र सरकारच्या वतीने त्यांनी चार वर्षे काम केले. त्यानंतर त्यांची मुंबईत बदली झाली होती. त्यानंतर काही वर्षांनी ते निवृत्त झाले.
अनेक वर्षांपासून फिरोझ रानडे यांनी वास्तुरचनाशास्त्र तसेच सामाजिक-राजकीय विषयांवर इंग्रजी तसेच मराठी वर्तमानपत्रांतून लेखन केले आहे. केंद्र सरकारच्या सेवेत असताना उत्तर भारतात त्यांनी बांधकाम क्षेत्रात पुष्कळ काम केले आहे. त्यातही मणीपूर आणि अरूणाचल प्रदेश राज्यांमध्ये त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.