जून महिन्याच्या सुरुवातीस राज्यात सर्वत्र जोरदारपणे कोसळणाऱ्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून दडी मारल्यामुळे आजवर झालेल्या ५७ पेरण्याही वाया जाण्याची भीती असून राज्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. मान्सूनच्या प्रारंभीच पावसाने दमदार हजेरी लावल्याने सरासरी ५७ टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी येत्या दोन तीन दिवसात पाऊस पडला नाही तर या पेरण्या वाया जातील, या भीतीने राज्यातील शेतकरी हैराण झाला आहे.
या आठवडय़ात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज  हवामान खात्याने व्यक्त केला असला तरी राज्याच्या अनेक भागात पावसाबद्दल आशादायी चित्र नसल्याने राज्य सरकारची झोप उडली आहे.
राज्यात १ जून ते ३ जुलैपर्यंत सरासरी ९१ टक्के पाऊस झाला. ३५५ तालुक्यांपैकी ३३ तालुक्यात ५० टक्के पेक्षा कमी, ७९ तालुक्यात ७५ टक्के पेक्षा कमी तर १५६ तालुक्यात १०० टक्के पेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे पेरणीच्या कामांना वेग आल्याने सरासरी ५७ टक्के पेरण्या झाल्या. त्यामध्ये मात्र गेल्या १५ दिवसापासून राज्यात पाऊस पडलेला नाही. कोकणात पाऊसच नसल्याने केवळ २ टक्के पेरण्या झाल्या असून पुणे विभागातही पावसाअभावी केवळ ३५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. औरंगाबाद विभागात सर्वाधिक ८१ टक्के तर नाशिक विभागात ५५ टक्के, लातूर विभागात ६० टक्के आणि नागपूर विभागात ४३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र आता पाऊसाने दडी मारल्यामुळे या  पेरण्या वाया जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येत्या आठवडय़ात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असला तरी १३ ते १५ जुलैपर्यत राज्यात पाऊस येण्याची शक्यता धूसर असल्याचे हवामान खात्याने कळविल्याने दुबार पेरणीच्या संकटाने सरकारची झोप उडाली आहे. झालेल्या पेरण्या वाचविण्यासाठी आणि लागवडीसाठी पावसाची नितांत गरज आहे, मात्र येत्या दोन तीन दिवसात पाऊस झाला नाही तर परिस्थिती चिंताजनक होऊ शकते असे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी सांगितले.