कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; मुलगा बचावला

गिरगाव, काकडवाडीतल्या मोगरा चाळीत राहाणाऱ्या मावळणकर कुटुंबाचा संसार आगीत बेचिराख झाला. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास तळमजल्यावरील लॉण्ड्रीत आग लागली. पहिल्या माळ्यावर राहणाऱ्या मावळणकर यांच्या घरात ती पसरली. त्यात सुहास मावळणकर(४५) यांचा मृत्यू झाला. पत्नी छाया पन्नास टक्क्यांहून अधिक भाजल्या, तर दहावीची परीक्षा देणारा त्यांचा मुलगा लोकेश जखमी झाला, पण थोडक्यात बचावला. आग लागली तेव्हा हे कुटुंब झोपेत होते. या प्रकरणी व्ही. पी. मार्ग पोलीस चौकशी व तपास करत आहेत.

पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर मोगरा ही बहुमजली चाळ आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सातच्या सुमारास तळमजल्यावरील लॉण्ड्रीत आग लागली. लॉण्ड्रीतल्या कपडय़ांनी आगीचे स्वरूप वाढले. आग पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या मावळणकर यांच्या घरी पसरली. जुनी चाळ असल्याने व जिने आणि फ्लोअरिंग लाकडी असल्याने आग आणखी पसरली.

व्ही. पी. मार्ग पोलीस ठाण्यातील अधिकारी, शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून जखमी छाया, लोकेश यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सुहास यांना पाच वर्षांपूर्वी अर्धागवायूचा झटका आल्याने ते हालचाल करू शकत नव्हते. त्यामुळे ते जास्त प्रमाणात भाजले. दुपारी बाराच्या सुमारास जेजे रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. छाया यांना पुढील उपचारांसाठी भाटिया रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेने दहावीची परीक्षा देणाऱ्या लोकेशला जबर धक्का बसला आहे. पूर्ण चौकशी केल्यानंतर या प्रकरणी गुन्हा नोंद केला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.