नोटाबंदीमुळे मासळी विक्री निम्म्यावर

नोटांच्या चणचणीमुळे ग्राहकांनी मासेखरेदीकडे फिरवलेली पाठ, बँकांतील व्यवहारांबाबतचे अज्ञान, पदरच्या ‘बाद’ नोटा स्वीकारण्यास घाऊक व्यापाऱ्यांचा नकार अशा कारणांमुळे मुंबईतील मंडयांमध्ये मासळीची किरकोळ विक्री करणाऱ्या कोळिणींसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. एकीकडे बाजारात निर्माण झालेली मंदी आणि दुसरीकडे साठय़ातील मासळी खराब होऊ लागल्यामुळे कोळिणींपुढे पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

In Nagpur a sister killed her brother after information about an immoral relationship
सख्खी बहीण पक्की वैरीण! प्रियकराला सुपारी देऊन भावाचा खून; अनैतिक संबंधाची कुणकुण लागल्याने…
Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या मंगळवारी ५००-१००० रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर चोखंदळ मांसाहारींना आपल्या जिभेचे चोचले पुरविणे अवघड बनले आहे. ५००-१००० रुपयांची रद्द झालेली नोट आणि सुट्टय़ा पैशांचा तोटा यामुळे मासळी बाजारावर मंदीचे सावट पसरू लागले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेकांनी बँकांबाहेर रांगा लावून नोटा बदलून घेतल्या. अनेकांच्या हाती २००० रुपयांच्या नोटा पडल्या. पण ४००-५०० रुपयांचे मासे खरेदी केल्यानंतर २००० रुपयांची नोट पुढे करणाऱ्या ग्राहकाला परत करण्यासाठी कोळणींकडे सुट्टे पैसेच नसल्याने मोठा प्रश्न निर्माण होत आहे. ग्राहकाला उधारीवर मासे देणे किंवा तो तयार असल्यास शिल्लक पैसे नंतर देणे अशा बोलीवर सध्या व्यवसाय करावा लागत आहे. काही गिऱ्हाईके नियमित येत असतात. त्यांनी विनंती केल्यानंतर मात्र कोळणी ५००-१००० रुपयांची नोट स्वीकारत आहेत. मात्र नोटाबंदीच्या निर्णयामुळे गेल्या आठवडय़ाभरात मासळी विक्रीच्या व्यवसायाची उलाढाल साधारण निम्म्यावर आल्याची भीतीही काही मंडळी व्यक्त करू लागली आहेत.

भल्या पहाटे घरातून बाहेर पडून ससून डॉक, भाऊचा धक्का, क्रॉफर्ड मार्केटजवळील शिवाजी मंडई आदी ठिकाणच्या घाऊक बाजारांतून मासळी खरेदी करायची आणि नेहमीच्या मंडईत जाऊन त्याची विक्री करायची, असा कोळणींचा दिनक्रम असतो. काही कोळणी मोठय़ा प्रमाणावर मासळी खरेदी करून त्याची मंडयांमध्ये किरकोळ विक्री करतात. बुधवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मासे विक्री होते. मात्र गेल्या मंगळवारी नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर बुधवारपासूून मासळी बाजारावर परिणाम झाला. अनेक जण हाती असलेले सुट्टे पैसे जपून वापरत आहेत. त्यामुळे मासळी बाजारातील गर्दी कमी होऊ लागली आहे.

नोटाबंदी केली असली तरी नेहमीची गिऱ्हाईक तुटू नयेत म्हणून त्यांच्याकडून ५००-१००० रुपयांच्या नोटा घ्याव्या लागत आहेत. पण घाऊक विक्रेते या नोटा घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे पदरी पडलेल्या नोटांचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बँकेचे व्यवहार करता येत नाहीत, त्यामुळे गिऱ्हाईकांकडून मिळालेल्या ५००-१००० रुपयांच्या नोटा बँकेतही भरता येत नाहीत.

चंद्रकला वैती, शिवाजी मंडई

ग्राहक ५००-१००० आणि २००० रुपयांच्या नोटा घेऊन येतात. त्यांना द्यायला आमच्याकडे सुट्टे पैसेच नाहीत. नेहमीचे गिऱ्हाईक आले तर आम्ही त्याच्याकडून ५०० रुपयांची नोट घेतो. पण गिऱ्हाईकांकडून घेतलेल्या ५००-१००० रुपयांच्या नोटा बँकेत भरायला आम्हाला वेळच मिळत नाही. गेल्या मंगळवारपूर्वी सुमारे एक लाख रुपयांचे मासे घाऊक बाजारातून घेतले होते. गेल्या आठवडय़ात त्यापैकी निम्मेच मासे विकले गेले. उरलेली मासळी खराब होऊ नये म्हणून ती बर्फात ठेवावी लागते. पण बर्फवाले ५००-१००० रुपयांच्या नोटा घेत नाहीत. मासळी खराब झाल्यामुळे होणारे नुकसान आम्हाला कोण भरून देणार?

नवीना घोलप, सी. जे. शाह, लालबाग राजा मंडई