* डॉ. द. भि. कुलकर्णी यांचाच अहवाल सादर
* ‘मसाप’ म्हणते, अहवाल सादर करण्याची सक्ती नाही
संमेलनाध्यक्षपदाच्या काळात साहित्यविषयक उपक्रम राबविण्यासाठी राज्यभरात फिरण्याकरिता एक लाख रुपयांची रक्कम मिळालेल्या तीन संमेलनाध्यक्षांपैकी डॉ. द. भि. कुलकर्णी यांचा अपवाद वगळता वसंत आबाजी डहाके आणि उत्तम कांबळे यांनी आपला अहवाल सादर केलेला नाही. संमेलनाध्यक्षांनी आपल्या कामाचा अहवाल सादर केलाच पाहिजे, अशी कोणतीही सक्ती सध्या नाही. मात्र तशी अट घातली आणि या माहितीचे दस्तऐवजीकरण झाले तर त्याला संदर्भमूल्य प्राप्त होणार आहे.     
महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून दरवर्षी साहित्य संमेलनात एक लाख रुपयांचा धनादेश विद्यमान संमेलनाध्यक्षांकडे सुपुर्द केला जातो. पुणे साहित्य संमेलनाचा खर्च वजा जाता ८२ लाख रुपये ‘मसाप’कडे शिल्लक राहिले होते. त्या रकमेच्या व्याजातून हे एक लाख रुपये देण्यात येतात. पुणे येथील संमेलनाचे अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्यासह आत्तापर्यंत उत्तम कांबळे, वसंत आबाजी डहाके यांना ही रक्कम देण्यात आली होती.
डॉ. द.भि. म्हणाले की, महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रातील साहित्य संस्था व ग्रंथालये आणि त्यांचे काम समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. माझ्या वर्षभरातील कामाचा अहवाल ‘मसाप’कडे सुपूर्द केला आहे. तसेच चिपळूण साहित्य संमेलनात स्मिता शानभाग संपादित ‘द.भि. संमेलन पर्व’ या प्रकाशित झालेल्या पुस्तकातही प्रवासातील निरिक्षणे आणि नोंदींची माहिती देण्यात आली आहे. तर डहाके यांनी सांगितले की, वर्षभराच्या काळात मी महाराष्ट्रातील विविध ग्रंथालयांना तसेच त्या त्या भागातील कवी, लेखक, वाचक यांना भेटलो. मराठी भाषा, साहित्य, जागतिकीकरण आणि मराठी साहित्य अशा विषयांवर भाषणे दिली. कामाचा अहवाल ‘मसाप’ला सादर केला नसला तरी लवकरच हे सर्व अनुभव आणि निरीक्षणे सादर करण्याचा आपला प्रयत्न आहे. तर उत्तम कांबळे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.
दरम्यान ‘मसाप’च्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्याकडे विचारणा केली असता, आमच्याकडे कोणाचाही अहवाल प्राप्त झाला नसल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, आम्ही संमेलनाध्यक्षांकडे त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल मागत नाही. त्यांच्यावर तशी सक्तीही नाही.