कल्याणमधील बाजारपेठ विभागातील गेल्या दीड महिन्यापासून बेपत्ता असलेले चार तरूण इराकमध्ये दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. या तरूणांच्या कुटुंबीयांनी सर्व आरोप फेटाळत आमच्या मुलांना परत आणण्यासाठी आम्ही परराष्ट्र विभागातर्फे प्रयत्न करणार आहोत. ज्यांनी आमच्या मुलांना फूस लावून पळून नेले आहे. त्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक पोलिसांनी या सर्व प्रकरणाबद्दल अनभिज्ञता दाखवून बाजारपेठ विभागातील चार तरूण मे महिन्यापासून बेपत्ता आहेत. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. ते कोठे गेलेत, कोठे आहेत याविषयीची आम्हाला काहीही माहिती नाही असे ठोकळेबाज उत्तर देण्यात येत आहे.
फहिदचे काका व माजी नगरसेवक इफ्तिकार खान यांनी सांगितले, मुलांची दिशाभूल करून त्यांना नेण्यात आले आहे. मुले उच्चशिक्षित आहेत. ती कोणत्याही दहशतवादी कृत्यात सहभागी होणारी नाहीत. त्यांना परत आणण्यासाठी परराष्ट्र खात्याशी आम्ही संपर्क करणार आहोत. चार तरूण बेपत्ता असल्याची तक्रार बाजारपेठ पोलिस ठाण्यात नोंद आहे. त्याची चौकशी सुरू आहे. ते तरूण कोठे गेले आहेत. किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी तरूणांची काही पत्रे आली आहेत हे पोलिसांना माहिती नाही, असे पोलिस उपायुक्त संजय जाधव यांनी सांगितले. कुटुंबीय राहत असलेल्या इमारतीत आता कोणाला सोडले जात नाही. काहींच्या घराला टाळे लावण्यात आले आहे.

अरीफ मजीद (२२), शईम तन्की (२६), फहद मकबूल (२४), अमन तांडेल (२०) अशी बेपत्ता तरूणांची नावे आहेत. अमनने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित तिघे अभियंत्याचे शिक्षण घेत आहेत. सिंगापूरमार्गे हे तरूण इरकामध्ये तेथील वंशवादी युध्दात सहभागी होण्यासाठी गेल्याचे बोलले जात आहे. त्यांचे कुटुंबीय मात्र हे आरोप फेटाळून लावत आहेत. ‘इराकमधील वंशवादी युध्दात सहभागी होण्यासाठी मी जात आहे. मला शोधू नका असे पत्र अरिफने आपल्या कुटुंबीयांना पाठवले असल्याचे बोलले जाते. अशाप्रकारचे कोणतेही पत्र आपणास आले नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.