मुंबईतील नामांकित मंडळांना सुबुद्धी

आगमन तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी ट्रकवर ध्वनिवर्धकांची भिंत उभारून दणदणाट करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना यंदा काही प्रमाणात सुबुद्धी झाली आहे. डीजेच्या दणदणाटामुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि त्याचा नागरिकांना होणारा त्रास पाहून मुंबईतील काही मोठय़ा गणेश मंडळांनी यंदा डीजेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढण्याचा निर्णय या मंडळांनी घेतला असून त्यांचा कित्ता मुंबईतील लहान मंडळांनीही गिरवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश धाब्यावर बसवून गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये कानठळ्या बसविणाऱ्या डीजेचा सर्रास वापर होतो. गेल्या काही वर्षांपासून तर ‘कोणाच्या डीजेचा आवाज मोठा?’ अशी स्पर्धा या मंडळांत लागते. या पाश्र्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश तसेच बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केलेले आवाहन याला यंदा काही प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला आहे. डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर आगमन-विसर्जन मिरवणुकांसाठी करावा, त्याचबरोबर मंडपस्थळी ध्वनिक्षेपकाचा आवाज मार्यादित ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे. त्याला मंडळांनी प्रतिसाद दिलेला आहे. न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले नाही, तर गोविंदा पथके आणि आयोजकांप्रमाणे आपल्याविरुद्धही गुन्हा दाखल होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन अनेक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर टाळण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उत्सवाच्या काळात मंडपस्थळी डेसिबलची मर्यादा पाळून ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याचा निर्धार काही नामांकित मंडळांनी केला आहे.

ध्वनिप्रदूषणाचे दुष्परिणाम जाणवू लागल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून डीजेला आम्ही सोडचिठ्ठी दिली आहे. यंदाही पारंपरिक वाद्याच्या तालात गणरायाची आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्यात येईल. त्याचबरोबर मंडपस्थळीदेखील ध्वनिक्षेपकाच्या आवाजाबाबतच्या मर्यादांचे पालन करण्यात येईल.

– गणेश गुप्ता, खजिनदार, माहीम मित्र मंडळ, कापडबाजार, माहीम (पू.)

लोकांचे कान आणि मनाची काळजी मंडळांना घ्यावीच लागेल. उत्सव टिकवायचा असेल तर नियमांचे पालन करावेच लागेल. यंदा डीजेला थारा देणार नाही. लेझीम अथवा ढोल-ताशासारख्या पारंपरिक वाद्यांचा गणेश मिरवणुकीत वापर केला जाईल.

– भाई मयेकर, रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, काळाचौकी,

गेल्या वर्षी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेचा वापर केला होता. त्याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. यंदा गणेश आगमन मिरवणुकीत डीजेचा वापर टाळण्यात आला. मात्र विसर्जन मिरवणुकीत कोणत्या वाद्यांचा वापर करायचा याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

– राजन कांदेकर, क्वारी रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भांडुप (पश्चिम)

गणेश आगमनाच्या मिरवणुकीत डीजेचा वापर केला जातो. परंतु न्यायालयाचे आदेश आणि समन्वय समितीने केलेले आवाहन लक्षात घेऊन कटाक्षाने नियमांचे पालन केले जाईल. डीजेसारख्या वाद्यांचा लोकांना त्रास होत असेल तर मंडळांनी काळजी घ्यायला हवी. मिरवणुकीसाठी भविष्यात पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात येईल.

– विजय नायकुडे, बाळ गोपाळ मंडळ, विलेपार्ले

डीजे ही पाश्चिमात्य संस्कृती आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या डीजेमुळे गणेशोत्सवात विकृतीचे दर्शन घडू लागले होते. डीजेमुळे मोठय़ा प्रमाणावर ध्वनिप्रदूषण होत असल्यामुळे आम्ही गेल्या १२-१५ वर्षांपासून गणेश मिरवणुकीतून त्याला हद्दपार केले आहे.

– स्वप्निल परब, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली, लालबाग