पालक, मका, चणाडाळीच्या पीठाचा वापर; मुंबईतील पर्यावरणतज्ज्ञाचा कलात्मक प्रयोग
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक जण नानाविध कल्पना लढवत असतात. शाडूच्या मातीच्या मूर्तीची निर्मिती असो की पंचधातूची कायस्वरूपी ठेवण्यात येणारी मूर्ती असो, अनेक जण हे ‘पर्यावरणपूरक’ पर्याय निवडतात. मात्र, मुंबईतील एका पर्यावरण तज्ज्ञाने चक्क खाद्यपदार्थापासून गणेश मूर्तीची निर्मिती केली आहे. या मूर्तीचे विसर्जन झाल्यावर त्यातील पदार्थ समुद्रातील माशांचे खाद्य ठरतील. गणेशमूर्तीचे सागरी परिसंस्थेशी एकरूप होण्याचा हा मार्ग अभिनव ठरणार आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या उंचच-उंच मूर्ती या हजारोंच्या संख्येने मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर गणेशोत्सवानंतर विसर्जित केल्या जातात. गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यात न विरघळणाऱ्या या मूर्ती समुद्रात विसर्जित होत असून यातील काही समुद्र तळाशी जाऊन बसतात तर काही पुन्हा अर्धवट तुटलेल्या अवस्थेत किनाऱ्यावर येतात. गेल्या १३ वर्षांपासून मुंबईतील पर्यावरण तज्ज्ञ आनंद पेंढारकर आणि त्यांचे सहकारी गिरगाव, जुहू या समुद्र किनाऱ्यावर आलेल्या मूर्ती गोळा करून पालिकेच्या ताब्यात देतात. मात्र, पालिकाही अशा मूर्ती पुन्हा खोल समुद्रात नेऊन विसर्जित करते आणि अनेक वर्षे आवाहन करूनही नागरिक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती उत्सवासाठी आणत असल्याचे निदर्शनास आल्याचे पेंढारकर म्हणाले.
समुद्रात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती तळाशी सागरी परिसंस्था बिघडवितात. मूर्तीवरील विषारी रंग माशांच्या आरोग्याला घातक ठरतात. त्यामुळे अरबी समुद्रातील मूर्ती विसर्जित झालेल्या ठिकाणचे जैववैविध्य हे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. असेही पेंढारकर यांनी सांगितले.
त्याऐवजी आपणच लोकांना पर्यावरणपूरक मूर्तीचा पर्याय द्यावा, या विचाराने गेल्या आठ वर्षांपासून पेंढारकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवण्यास सुरूवात केली. दरवर्षी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी वेगळे उपाय अवलंबताना गेल्या वर्षीपासून त्यांनी अनोख्या पद्धतीने गणेश मूर्ती बनवल्या. माशांच्या शाकाहारी खाद्यापासूनच या मूर्ती बनवण्यात येत असून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करणारी मंडळी या मूर्ती खरेदी करण्यासाठी पुढे येत आहेत. मूर्तीसाठी संपर्क झ्र् ९८२०१४०२५४

पालक, मका, चण्याच्या डाळीचे पीठ आदींचे नूडल्स तयार करण्यात येतात. शाडूच्या मातीमधून मूर्तीचा सांगाडा बनवण्यात येत असून त्याच्या आत या शाकाहारी पदार्थापासून बनवलेल्या नूडल्स पूर्णपणे भरण्यात येतात. त्यानंतर हळद, मूलतानी माती, गेरू आणि कुंकू यांपासून मूर्ती रंगवण्यात येते. हा प्रयोग गेल्यावर्षी पासून आम्ही सुरू केला असून याला महाविद्यालयीन विद्यार्थी प्रतिसाद देत आहेत.
– आनंद पेंढारकर, पर्यावरण तज्ज्ञ