राज्याच्या अंतर्गत भागात पोहोचलेला पाऊस आणखी दोन दिवस तरी तसाच बरसत राहण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी कोकण आणि गोवा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
बुधवारी सकाळी मुंबई शहर व उपनगरात थोडी विश्रांती घेत जोरदार सरी येत होत्या. सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत सांताक्रूझ येथे ४०.४ मिमी तर कुलाबा येथे ७४.४ मिमी पावसाची नोंद झाली. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. मात्र या पावसाचा प्रभाव पुन्हा वाढणार आहे. अनेक दिवसांनी आलेला पाऊस आता तळ ठोकणार असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे या भागात मान्सून अधिक सक्रीय असेल. गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबई वगळता कोकणातील इतर जिल्ह्य़ात- ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे मुसळधार पावसाची शक्यता मुंबई हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. राज्याच्या अंतर्गत भागातही पावसाचा प्रभाव जाणवणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या उर्वरित भागात मान्सून पोहोचण्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला आहे.

आज सकाळी भरती
मुंबई किनाऱ्यावर गुरुवारी सकाळी १०.४२ वाजता भरती येणार आहे. यावेळी पाण्याची उंची ४ मीटरपर्यंत वाढणार आहे. या वेळेस मुसळधार पाऊस पडल्यास जलवाहिन्यांमधून शहरातील पाणी समुद्रात जाऊ शकणार नाही. त्यामुळे सखल भागात पाणी तुंबण्याचा धोका आहे.