शिक्षण क्षेत्रात निष्ठेने व उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्काराबरोबरच घोषित केली गेलेली रक्कम सहा महिने उलटले तरी अद्याप दिली गेलेली नाही.
१९८४पासून शिक्षकांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्यात येत होती. परंतु, सप्टेंबर, २०१४ला राज्य सरकारने या विषयी नव्याने निर्णय घेऊन २०१३-१४पासून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काप्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्याऐवजी एक लाख रुपये रोख रक्कम देण्याचे ठरविले. ५ सप्टेंबर, २०१४ रोजी राज्य शिक्षक पुरस्कार सोहळा पुण्यात पार पडला. मात्र, त्यांच्या पुरस्काराची रक्कम सहा महिने झाले तरी शिक्षकांना देण्यात आलेली नाही. पुरस्काराच्या रक्कमेपासून शिक्षकांना वंचित ठेवण्याच्या या प्रकाराचा शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी निषेध केला आहे.
या शिवाय २००९-१० ते २०१२-१३ या काळातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांबाबत अध्यापही कोणताही निर्णय झालेला नाही.