कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बारवी धरणाची उंची वाढविणे हा एकच पर्याय आहे, असे राज्य सरकारच्या वतीने शुक्रवारी विधान परिषदेत स्पष्ट करण्यात आले. धरणाची उंची वाढविल्यामुळे बाधित होणाऱ्या गावांचे पुनर्वसन कसे करायचे हा प्रश्न पुढे येणार आहे. या संदर्भात उपसभापती वसंत डावखरे यांच्या सूचनेनुसार सोमवारी एक खास बैठक घेण्यात येणार आहे.   
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात काँग्रेसचे संजय दत्त यांनी लक्षवेधी सूचनेवर बोलताना, ६ टीएमसी पाण्याचा अधिकचा साठा उपलब्ध होण्यासाठी बारवी धरणाची उंची वाढवावी लागणार आहे, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. मात्र त्यामुळे बुडित क्षेत्रात येणाऱ्या सहा गावांच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला आहे. २ टीएमसी पाणीसाठा होईल, एवढी धरणाची उंची वाढवण्याची कार्यवाही सुरु आहे. परंतु, त्यामुळे दोन गावांचे व १२० कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागणार आहे, असे त्यांनी निदर्शनास आणले.  
पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, त्यावर इसापनीतीतील गोष्टीसारखी उत्तरे दिली जात आहेत, अशा शब्दांत डावखरे यांनी नापसंती व्यक्त केली. या संदर्भात सोमवारी एक बैठक घ्यावी अशी सूचना त्यांनी केली. त्यावर संबंधित मंत्री व अधिकारी यांची एक बैठक घेऊन कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागारिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा, यावर चर्चा करुन मार्ग काढला जाईल, असे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.