‘‘सहा गुंडांनी चाकुचा धाक दाखवून आपले अपहरण केले. रस्त्यामध्ये कार थांबल्यानंतर या गुंडांपैकी चौघे झोपले आणि उर्वरित दोघे पहारा देत होते. त्यापैकी एकाच्या हाताला चावा घेतला आणि दुसऱ्याला दगड मारून मी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली..’’ एखाद्या गुन्हेविषयक मालिकेतील कथेला शोभेल, अशी कहाणी औरंगाबादमध्ये राहणाऱ्या प्रेम गुडे या ११ वर्षीय मुलाने ठाणे पोलिसांसमोर रंगवली. पण, ठाणे पोलिसांच्या चार्तुयापुढे त्याची ही कथा फार काळ टिकू शकली नाही. शाळेत शिक्षक मारतात, या भीतीपोटी एका मित्रासोबत त्याने घरातून पलायन केल्याचे सत्य समोर येताच पोलिसांनी त्याच्या कुटूंबीयांशी संपर्क साधला आणि तो कुटूंबापासून विभक्त होण्यापासून बचावला.
औरंगाबादमध्ये प्रेम राहत असून तो अभ्यासातही हुशार आहे. तो राहत असलेल्या परिसरात त्याचा विठ्ठल नावाचा मित्र राहतो. दोघांनी घरातून पळून जाण्याचा बेत आखला. ठरल्याप्रमाणे दोघेही १७ नोव्हेंबरला एकमेकांना भेटले आणि त्यानंतर त्यांचा रेल्वेने औरंगाबाद-नाशिक-मुंबई असा प्रवास सुरू झाला. एक दिवस त्यांनी नाशिकमध्ये काढला. त्यानंतर ते मुंबईतील कुर्ला स्थानकात आले. दरम्यान, रेल्वे रुळावरून दोघेही जात असताना पोलिसांनी त्यांना हटकले. त्यामुळे दोघेही वेगवेगळ्या दिशेने पळून गेले. यापैकी प्रेम उल्हासनगरला आला. दरम्यान, रस्त्यामध्ये चुकामूक झाली तर पुन्हा भेटण्यासाठी नाशिकमधले एक ठिकाण त्यांनी ठरविले होते. मात्र, तिथे नेमके कसे जायचे, याविषयी प्रेम अनभिज्ञ होता. त्यामुळे उल्हासनगरमध्येच फिरत असतानाच रात्री गस्तीवर असलेल्या ठाणे पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिट या पथकाला तो सापडला. या पथकातील पोलीस उपनिरीक्षक कमलउद्दीन शेख यांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने सुरुवातीला खोटी कथा सांगितली. मात्र, या कथेत सत्य वाटत नसल्याने या अधिकाऱ्याने त्याची खोलवर चौकशी केली. त्यामध्ये त्याने शाळेत शिक्षक मारत असल्याने मित्रासोबत घरातून पलायन केल्याची कबुली दिली.
 दरम्यान, प्रेमचे अपहरण झाल्याप्रकरणी औरंगाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे ठाणे पोलिसांनी प्रेमला औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे, अशी माहिती चाईल्ड प्रोटेक्शन युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली.