पश्चिम रेल्वेवर चालत्या गाडीवर दगड भिरकावण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांत वाढ झाली आहे. याची गंभीर नोंद रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे या पुढे धावत्या रेल्वेवर दगड मारल्यामुळे प्रवासी, लोको पायलट, मोटरमन किंवा सुरक्षारक्षक जखमी झाल्यास दगड मारणाऱ्याला रेल्वे नियमानुसार जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. रेल्वे प्रशासनाने दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर यापुढे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले जातील असे म्हटले.झोपडय़ांमधून किंवा लोहमार्गाच्या बाजूला वावर असलेले समाजकंटक धावत्या रेल्वेवर दगड भिरकावतात. मागील काही महिन्यांमध्ये असे अनेक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रवासी, मोटरमन, सुरक्षारक्षक किंवा लांबपल्लय़ाच्या गाडय़ांमधील लोको पायलट जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत.

जानेवारी २०१७ ते मे २०१७ या कालावधीत पश्चिम रेल्वेमार्गावर  धावत्या लोकलवर दगडफेकीच ३४ प्रकार घडले आहेत. दगड भिरकावणारा माथेफिरू किंवा समाजकंटक दोषी ठरल्यास रेल्वे नियमानुसार त्याला प्रसंगी १० वर्षे जन्मठेपेची शिक्षा होऊ  शकते किंवा कारावास होऊ  शकतो असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.