‘लोकसत्ता लोकांकिका’ला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विषयांचे वैविध्य

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत मुंबई विभागाच्या प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या दिवशी सादर झालेल्या एकांकिकांमधून सामाजिक, राजकीय, लैंगिकता ते मानसशास्त्रीय अशा वैविध्यपूर्ण विषयांचा वेध घेण्यात आला. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर संकुलातील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या सभागृहात रविवारी प्राथमिक फेरीतील अन्य महाविद्यालयांच्या एकांकिका सादर झाल्या. त्यातील सहा एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. आता ११ डिसेंबरला होणाऱ्या मुंबई विभागीय अंतिम फेरीत ‘लास्ट ट्राय’ (कीर्ती महाविद्यालय), ‘दप्तर’ (महर्षी दयानंद महाविद्यालय), ‘श्यामची आई’ (सिडनहॅम महाविद्यालय), ‘केस नंबर’ (म. ल. डहाणूकर महाविद्यालय), ‘ओवी’ (साठय़े महाविद्यालय) आणि  ‘माइक’ (डॉ. टी. के. टोपे रात्र महाविद्यालय) या एकांकिका सादर होतील.

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमी-पुणे’, ‘झी युवा’ व ‘अस्तित्व’ यांच्या सहकार्याने ही स्पर्धा रंगली. स्पर्धेचे ‘टॅलेंट पार्टनर’ म्हणून ‘आयरिस प्रॉडक्शन’ यांनी काम पाहिले. स्पर्धेचे परीक्षक प्रा. अनिल बांदिवडेकर व नीळकंठ कदम यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.