‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा

‘श्यामची आई’ ते शाळकरी मुलांच्या खांद्यावरचे बोलके ‘दप्तर’ असे वैविध्यपूर्ण विषय हाताळत विभागीय अंतिम फेरीत पोहोचलेले मुंबईकर महाविद्यालयीन नाटय़वेडे आता मुंबई विभागाच्या अंतिम फेरीसाठी सज्ज झाले आहेत. सहा महाविद्यालयांच्या सहा एकांकिका, सहा नवे विषय आणि तेवढीच सळसळती ऊर्जा यांचा अनोखा आविष्कार रसिक प्रेक्षकांच्या गर्दीत ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे. आज, रविवारी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात मुंबई विभागाचा अंतिम अंक रंगणार असून त्यात सर्वोत्तम ठरणारी एकांकिका या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे.

प्राथमिक फेरीच्या कसोटीतून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या सहा महाविद्यालयांमध्ये महाअंतिम फेरीसाठीची चुरस रंगणार आहे. कीर्ती महाविद्यालयाची ‘लास्ट ट्राय’, सिडनहॅम महाविद्यालयाची ‘श्यामची आई’, म. ल. डहाणूकर महाविद्यालयाची ‘केस नंबर’, साठय़े महाविद्यालयाची ‘ओवी’, डॉ. टी. के. टोपे रात्र महाविद्यालयाची ‘माइक’ आणि महर्षी दयानंद महाविद्यालयाची ‘दप्तर’ या सहा एकांकिका विभागीय अंतिम फेरीसाठी सज्ज झाल्या आहेत. ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमी, पुणे’ व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे स्पर्धेसाठी टॅलेण्ट पार्टनर असून ‘अस्तित्व’ या संस्थेच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ची महाअंतिम फे री रसिकांना ‘झी युवा’ वाहिनीवरून पाहायला मिळणार आहे.

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या प्राथमिक फेरीतच मुंबईतील महाविद्यालयांनी आपला जोर लावला होता. वेगळे विषय, अनोखे नेपथ्य या सगळ्याचा वापर करून आपली एकांकिका प्रभावीपणे सादर करणाऱ्या या महाविद्यालयीन स्पर्धकांसमोरचे आव्हान आता अधिकच कडवे झाले आहे. एकीकडे परीक्षांचे आव्हान पेलूनही जोरदार कसून तालमी करताना झालेली दमछाक बाजूला ठेवत पुन्हा त्याच उत्साहाने ही मंडळी अंतिम फे रीसाठी तयार झाली आहेत. ‘जिंकणार कोण? आम्हीच..’चा नारा देत प्रत्येक महाविद्यालय या अंतिम फे रीत त्याच विश्वासाने उतरणार आहे. त्यामुळे पूर्ण तयारीनिशी, आत्मविश्वासाने भारलेली ही नाटय़वेडी तरुणाई ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबई विभागीय अंतिम फे रीचा रंगमंच दणाणून सोडणार यात शंका नाही.

विभागीय अंतिम फेरी..

  • कुठे : स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर
  • कधी : आज, रविवार, ११ डिसेंबर
  • केव्हा : सकाळी ९.४५ वाजता

(प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.. कार्यक्रम स्थळी मोफत प्रवेशिका अर्धा तास आधी उपलब्ध.. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव)