पुणे विद्यापीठाचा ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे प्रतिक्रिया उमटलेल्या इतर मागासवर्गीय वर्गाला चुचकारण्याच्या उद्देशानेच हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.
मराठवाडा विद्यापीठाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करताना सरकारचे हात तेव्हा चांगलेच पोळले होते. यामुळेच पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय घेताना सावधगिरी बाळगण्यात आली. पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रस्ताव मांडण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याबद्दल सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ हे निषेध व्यक्त करीत बैठकीतून बाहेर पडले होते. सोमवारच्या बैठकीत पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय घेण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नामविस्ताराचा ठराव मंजूर केला होता. या आधारेच सरकारने हा निर्णय घेतला आहे.  
पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय घेण्यात आला असता भुजबळ यांनी, सोलापूर विद्यापीठाला आहिल्याबाई होळकर तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची मागणी केली. मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे इतर मागासवर्गीय समाजात काहीशी नाराजीची भावना आहे. यावर उतारा म्हणूनच पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय घेण्यात आला.