उच्च न्यायालयाने फटकारूनही भाजपने महाराष्ट्र दिनानिमित्त शहरभर पक्षाचे हजारो झेंडे लावले असून शिवसेना भवन, हुतात्मा चौक परिसराला तर झेंडय़ांनी वेढले आहे. शिवसेनेने हुतात्मा चौकासह शहरातील काही भागांत भगवे झेंडे लावून व अखंड महाराष्ट्राचे फलक लावून प्रत्युत्तर दिले आहे. झेंडे, फलक लावून शहर विद्रूप न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देऊनही आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर झेंडायुद्ध रंगलेआहे.
शिवसेनेने दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र दिनानिमित्त शहरात साडेतीनशेहून अधिक शाखांच्या परिसरात कार्यक्रम आयोजित केले आहेत. भाजपने मात्र महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आणि शिवसेनेला शह देण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम आयोजित केले. त्यानिमित्तानेभाजपने शहरात अनेक ठिकाणी झेंडे लावले असून दादरला शिवसेना भवन, हुतात्मा चौक, मरिन ड्राइव्ह आदी परिसरांत सर्वत्र भाजपचे झेंडे आहेत. विनापरवाना झेंडे, बॅनर्स, पोस्टर लावून शहर विद्रूप करू नये, असे उच्च न्यायालयाचे राजकीय पक्षांना आदेश आहेत. भाजप मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांना न्यायालयाने फटकारलेही होते.

भाजप-सेनेचा ‘तह’
विमानतळानजीकच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यावरून ‘आमनेसामने’ आल्याने भाजप शिवसेनेने ‘तह’ करून महाराष्ट्र दिन साजरा केला. भाजपने शनिवारी शिवरायांना अभिवादन केले, तर शिवसेनेने रविवारी त्याच ठिकाणी ‘अखंड महाराष्ट्र’ देखावा साकारत अभिवादन केल्याने उभयपक्षी कुरबुरी टळल्या.अखंड महाराष्ट्रासाठी वेळ पडल्यास संघर्ष करण्यात येईल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी केले. कार्यक्रमासाठी दोन्ही पक्षाने जीव्हीके कंपनीकडे शिवरायांच्या पुतळ्याजवळची जागा ३० एप्रिल व १ मे रोजी मागितली होती. त्यामुळे वादाची शक्यता होती. पण नेत्यांनी सामोपचारी भूमिका घेत ‘तह’ केला.