महाराष्ट्राच्या आदिवासी भागातील बालमृत्यू ही दिवसेंदिवस चिंताजनक बाब बनत चालली आहे. आदिवासींमधील अंधश्रद्धेमुळे डॉक्टरकडे जाण्याऐवजी आपल्या बाळाला भगत, बाबा, महाराज व वैदूक डे नेण्याला आदिवासी प्राधान्य देतात. नेमकी ही बाब हेरून भगताकडे जाणाऱ्या आजारी बालकांना रुग्णालयाकडे वळविण्यासाठी पालकांना प्रोत्साहन द्यावे यासाठी भगताला १०० ते ५०० रुपये देण्याची योजना आरोग्य विभागाने आखली आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात नवजात बालकांना रुग्णालयात उपचार मिळून बालमृत्य रोखण्यात यश येईल, असा आरोग्य विभागाचा विश्वास आहे.
ठाण्यातील जव्हार मोखाडा, अमरावतीमधील मेळघाट, नाशिक येथील पेट-सुरगणा यासह आदिवासी भागांमध्ये माता व बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून अनेक उपाययोजना वर्षांनुवर्षे करूनही बालमृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. यामागे आदिवांसीमध्ये असलेल्या अंधश्रद्धेचा भाग मोठा असल्याचे आरोग्य विभागाच्या पाहाणीत लक्षात आले. त्यामुळे याच अंधश्रद्धेचा सकारात्मक वापर करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतला.
मंत्रालयात बुधवारी माता व बालमृत्यूसंदर्भातील बैठकीत मेळघाटसह आदिवासी भागातील उपचाराचा आढावा घेताना एकटय़ा मेळघाटमध्ये २३० नोंदणीकृत भूमके (भगत) असून त्यांचा वापर करण्याची भूमिका आरोग्यमंत्र्यांनी मांडली. आदिवासी व्यक्ती भूतबाधा अथवा चेटूक झाल्याच्या भावनेतून आजारी बालकाला घेऊन भगताकडे जाते व पोटासाठी कोंबडे अथवा धान्य मागून तो उपचार करतो. यात वेळेत बालकाला उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू येतो. प्रामुख्याने पहिल्या सात दिवसात मृत्यू होण्याचे प्रमाण हे ५० टक्के असल्यामुळे पहिल्या सात दिवसात बाळाला जो भगत रुग्णालयात घेऊन येईल त्याला ५०० रुपये, एक आठवडा ते एक महिन्यात बाळाला रुग्णालयात आणणाऱ्या भगताला ३०० रुपये अशाप्रमाणे आजारी बालकांना रुग्णालयात आणणाऱ्या भगताला पैसे देण्याची योजना असून याबाबतचा प्रस्ताव एक आठवडय़ात तयार करण्याचे आदेश दिल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
भगतांच्या पोटापाण्याची काळजी घेतल्यास मदत होईल – डॉ. दीपक सावंत
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील आदिवासींची लोकसंख्या सुमारे ९० लाख एवढी असून याच भागात सुमारे साडेचार हजार भगतांना वैदू, महाराज, भूमके अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. त्यांना नवजात बालकाच्या आजाराचे गांभीर्य ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून  त्यांच्या पोटापाण्याची काळजी घेतल्यास ते निश्चित सहकार्य करतील असा विश्वासही डॉ. सावंत यांनी व्यक्त केला. आदिवासी भागातील माता व बालमृत्यू रोखण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. तथापि आदिवासीवर अंधश्रद्धेचा प्रभाव असल्यामुळे भगताकडे जाण्याची त्यांची मानसिकता असते. अंधश्रद्धेला खतपाणी न घालता त्यांना रुग्णालयाकडे वळविण्याची ही योजना आहे.