मुख्यमंत्र्यांची टीका;  कर्जमाफीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये भरीव तरतूद करण्याची ग्वाही

शेतकरी कर्जमाफीची केवळ पोकळ घोषणा नसून या अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये भरीव तरतूद करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकारपरिषदेत केली. महिनाभरात अर्ज स्वीकारले जातील व छाननी सुरू होईल आणि कर्जमाफी देण्यास सुरुवात होईल. मात्र, त्यासाठी आधारसक्ती राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. काही शेतकरी नेते आपली ‘दुकानदारी’ चालविण्यासाठी नवीन मुद्दे उपस्थित करून आंदोलने करीत असल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात ‘आपलं सरकार’ च्या २५ हजार केंद्रांवरही कर्जमाफीचे अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती दिली. विरोधकांमध्ये फूट पडल्याने विरोधी पक्षांनी दोन पत्रकारपरिषदा घेऊन नवीनच पायंडा पाडला असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडत कर्जमाफीविषयी माहिती दिली. कर्जमाफीची नुसतीच घोषणा आहे, फसवी आहे, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र ही केवळ घोषणाबाजी नसून अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडल्या जातील व आर्थिक तरतूदही केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र निधीउभारणी कोठून व कशी करणार, किती निधी लागणार, याबाबतच्या प्रश्नांना उत्तर देणे फडणवीस यांनी टाळले. कर्जमाफीसाठी अतिशय सोपे अर्ज असून आधार क्रमांकाची मात्र सक्ती राहणार आहे, असे सांगून ते म्हणाले, शेतकरी, त्याची पत्नी किंवा पती व अज्ञान मुले यांच्या बँक खात्यांचा तपशील द्यावा लागेल. गेल्या वेळी झालेल्या कर्जमाफीमध्ये बोगस खात्यांवर पैसे जमा केले गेल्याचे महालेखापालांच्या (कॅग) चौकशीत आढळून आले होते. ते टाळण्यासाठी आधार व बँक खात्यांचा तपशील शेतकऱ्यांना द्यावा लागणार आहे. महिनाभरात अर्जस्वीकृती प्रक्रिया झाल्यावर लगेच छाननी सुरू होईल आणि कर्जमाफीस सुरुवात होईल. मात्र पहिली कर्जमाफी किंवा सातबारा कोरा किती दिवसात होईल, हे नेमकेपणे सांगणेही त्यांनी टाळले.

सुकाणू समितीतील व अन्य शेतकरी नेते समाधानी नसून आंदोलनाच्या तयारीत असल्याबद्दल विचारले असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. काहीतरी फाटे फोडून हा विषय पेटत राहावा व आपली दुकानदारी सुरू राहावी, असा काही शेतकरी नेत्यांचा प्रयत्न आहे, असे फडणवीस म्हणाले.

दुबार पेरणीचे संकट नाही

राज्यात चांगला पाऊस होत असून दुबार पेरणीचे संकट सध्या तरी दिसत नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सध्या १८८.६८ लाख हेक्टरवर म्हणजे सुमारे ८५ टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.

शिवसेनाप्रमुखांच्या कार्याचा गौरव करण्याबाबत ठराव नाही

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्याबद्दल गौरव करताना पहिला ठराव कोणाचा, यावरून वाद आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय, नानाजी देशमुख, गणपतराव देशमुख यांच्या कार्याबद्दलही गौरव करण्यासाठी ठराव आहे. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याबद्दल गौरव करण्याबाबत ठराव नाही. या मुद्दय़ावर फडणवीस यांना विचारता, ठाकरे यांच्याबद्दल भाजप व शिवसेना दोघांनाही आदर आहे. ते आमचे सन्माननीय नेते होते. पण  गौरवपर ठरावामध्ये ५० वर्षे, शताब्दी असणाऱ्या नेत्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. ठाकरे यांच्याबाबत सध्या तसे कोणतेही औचित्य नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिवसेनेबरोबर सध्या आमचे चांगले चालले असून त्यांच्याबरोबरच पाच वर्षे सरकार स्थिर राहील, असेही त्यांनी सांगितले.

विरोधकांवर टीकास्त्र

विरोधकांमध्ये फूट पडली असल्याने अधिवेशनपूर्व स्वतंत्र पत्रकारपरिषदा घेण्याचा नवीन पायंडा त्यांनी पाडला. आम्ही विरोधी पक्षात असताना असे झाले नव्हते, असे सांगून पहिला ठराव कोणाचा, हा वाद सामोपचाराने मिटेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मलिष्का केंद्रबिंदू !

मुंबई : ‘मुंबई तुझा महापालिकेवर भरवसा नाही का’ हे विडंबनगीत गाणाऱ्या मलिष्का हिला शिवसेनेच्या रोषाचा फटका बसला असला तरी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकार आणि विशेषत: शिवसेनेला डिवचण्याकरिता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मलिष्का हिलाच केंद्रबिंदू ठेवले होते. मलिष्काच्या घराची पाहणी करण्याकरिता महानगरपालिकेचे अधिकारी ज्या तत्परतेने गेले तशी तत्परता ‘मातोश्री’च्या पाहणीसाठी का दाखविण्यात आली नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या बेबनावाच्या पाश्र्वभूमीवर विखे-पाटील यांना विचारण्यात आले असता राधाकृष्ण विखे यांनी राष्ट्रवादीचा आमच्यावर भरवसा नाही का, असा सवाल मलिष्का हिच्या विडंबनगीताचा आधार घेत केला. ‘सरकारचा कारभार गोल-गोल, कारभारात मोठा झोल-झोल,’ असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका करण्यासाठी मलिष्का हिच्याच गाण्यातील कडव्याचा हवाला दिला.

उद्धव ठाकरे आणि गझनी

‘गझनी’ चित्रपटात जुनी छायाचित्रे बघितल्यावर आमिर खान याची स्मृती जागृत होते. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपण काय बोललो याची कात्रणे पाठविणार असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले. कर्जमुक्तीशिवाय गप्प बसणार नाही किंवा समृद्धी मार्गाला विरोध करू, अशी अनेक विधाने ठाकरे यांनी केली. पण प्रत्यक्षात त्यांची कृती वेगळी दिसते, असा टोलाही विखे-पाटील यांनी लगावला.