शिवसेना नेते दिवाकर रावते यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शेतकरी पती-पत्नी दोघांचेही कर्ज असल्यास जास्त कर्जासाठी माफी देऊन सातबारा कोरा करावा, अशी मागणी परिवहन मंत्री व शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सरकारने पैसे वाचविण्याचा प्रयत्न करु नये, शेतकरी कुटुंबाला दिलासा द्यावा, असे रावते यांनी स्पष्ट केले.

कर्जमाफीसाठी सरकारने शेतकरी पती-पत्नी यांची माहिती संकलित केली असून दोघांची वेगवेगळ्या सातबारावर स्वतंत्र कर्जे असली तरी कुटुंबाला दीड लाख रुपयांची मर्यादा कर्जमाफीसाठी घालण्यात आली आहे.

कर्जमाफीसाठी महिलांना प्राधान्य देण्याचा सरकारचा निकष आहे. दीड लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असल्यास उर्वरित रक्कम भरली, तरच दीड लाख रुपयांचे कर्ज माफ होईल, अशीही अट आहे. शेतकऱ्याच्या नावे एक लाख २० हजार आणि त्याच्या पत्नीच्या नावे ८० हजार रुपये कर्ज असल्यास दोघांचे एकत्रित कर्ज दोन लाख रुपये होईल. त्यामुळे ५० हजार रुपये भरल्यास दीड लाख रुपये कर्ज माफ होईल,

अशी कार्यपध्दती ठरविण्यात आली आहे. त्यास रावते यांनी विरोध केला असून पती-पत्नीपैकी ज्याच्या नावावर अधिक कर्ज आहे, ते माफ करुन सातबारा कोरा करावा, अशी मागणी रावते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.