गृहविभागाचा आदेश; पोलीस महासंचालक बोधचिन्हाची संख्या वाढवली
राज्य सरकारने लागोपाठ तीन वेळा शिफारस करूनही राष्ट्रपती पदक न मिळालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आता राज्य शासनाने सन्मान करण्याचे ठरविले आहे. पोलीस महासंचालक बोधचिन्ह देऊन अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिसांना राष्ट्रपती पदक मिळण्यासाठी राज्य सरकारकडून शिफारस केली जाते. परंतु, तरीही काही अधिकारी त्यापासून वंचित राहतात. तसेच जोखमीची कामगिरी पार पाडणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा यापूर्वीपासूनच महासंचालक बोधचिन्ह देऊन गौरव करण्यात येतो. आता पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची २ लाख ४० हजार इतकी वाढलेली संख्या लक्षात घेऊन पोलीस महासंचालक बोधचिन्हाची संख्याही २५० वरून ५०० करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गृह विभागाने तसा आदेश काढला आहे.
दरोडेखोर, गुन्हेगारांच्या टोळ्यांविरुद्धची कारवाई, सर्व प्रकारच्या सनसनाटी व कठीण गुन्ह्य़ांचा यशस्वीपणे तपास करणे, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य करणे, जनतेच्या समस्या सोडवून पोलिसांची प्रतिमा उजळणे, राष्ट्रीय स्तरावरील खेळात प्रावीण्य मिळविणे, २५ वर्षांच्या सेवेचा उत्तम अभिलेख राखणे, पोलीस मोटार परिवहन विभागातील चालकाने अपघात न करता २० वर्षांचा सेवाअभिलेख उत्तम ठेवणे, विशेष शाखेत पाच वर्षे उत्तम कामगिरी, गडचिरोली, चंद्रपूर तसेच इतर जिल्ह्य़ांतील नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालणे यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

* ५०० बोधचिन्हांपैकी, चकमकीत जखमी झालेल्या, अतिरेक्यांविरुद्ध व नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत सामील झालेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी २० टक्के म्हणजे १०० बोधचिन्हे राखीव ठेवण्यात येणार आहे, असे गृह विभागाच्या आदेशात म्हटले आहे.