मुंबईतील विद्यार्थ्यांनी आणि कलाकारांनी ‘मेक इन इंडिया’ सोहळ्याला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेल्या विविध कलाकृती क्रॉस मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत. वेगवेगळ्या विषयांवरील या कलाकृतींतून अत्यंत नेमकेपणाने या सोहळ्याचे सारसूत्र मांडतात.

* रंगीबेरंगी चप्पल
‘कोल्हापुरी चप्पल’ काळाच्या ओघात मागे पडत असली तरी तिची एका वेगळ्याच ढंगात ओळख करून दिली आहे, कनिका बावा हिने. कोल्हापुरी चपलेला वेगवेगळ्या रंगांतून पुन्हा लोकांसमोर आणण्याचा तिचा प्रयत्न आहे. त्यासाठी तिने ८ फूट उंच आणि १० फूट रुंद चप्पल तयार केली असून ती पाहणाऱ्याला नक्कीच आकर्षित करेल.

* सोन्याचा पक्षी
‘रचना संसद’ या संस्थेतील काही विद्यार्थ्यांनी ‘सोन्याचा पक्षी’ ही एका पांढऱ्या मोराची कलाकृती साकारली आहे. पक्ष्याच्या पंखावर अब्दुल कलाम, वाघ, शिवाजी महाराज, शास्त्रीय नृत्य प्रकार दर्शविणारा मुखवटा अशा देशाला ओळख मिळवून देण्याऱ्यांचे चित्र या मोराच्या पंखावर कोरण्यात आले आहे.

* गोदीवाडय़ातील सिंह
मुंबईतील ‘नौसेना गोदीवाडा’ या संस्थेने गोदीवाडय़ातील सिंह उभारला आहे. हा सिंह टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आला आहे. यामध्ये मोटर केसिंग, मोटरचे जनरेटर आवरण, टर्मिनल बॉक्स यांचा वापर करून ए.के.जाधव यांच्या संकल्पनेतून हा सिंह साकारण्यात आला आहे. वाटेत आलेले अडथळे दूर करून यशाकडे वाटचाल करणे हा या शिल्पकलेमागील विचार आहे.

* पोलिसांना ‘सलाम’
मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वाला सलामी देणारी कलाकृतीही पाहायला मिळणार आहे. ही कलाकृती सुमीत पाटील नावाच्या कलादिग्दर्शकाने उभारली असून दैनंदिन जीवनात आपल्या सुरक्षिततेची काळजी घेणारे पोलीस, कुठल्याही सण-उत्सवात सहभागी न होता सतत कर्तव्यदक्ष असलेल्या पोलिसांना कृतज्ञतापूर्वक सलामी देण्यासाठी पोलिसाची चौदा फूट उंचीची कलाकृती उभारण्यात आली आहे.

* स्वातंत्र्याची घंटा
‘स्वातंत्र्याची घंटा’ या शीर्षकाखाली अॅल्युमिनीअमची १२ फूट उंचीची कलाकृती सीमा कोहली हिने साकारली आहे. महात्मा गांधीचे अहिंसेचे तत्त्व व पिकासोच्या कलेच्या माध्यमातून ही कलाकृतीची साकारण्यात आली आहे. यात देशातील घटनांचा आढावा देणाऱ्या बातम्यांची कात्रणे चिकटविली आहेत. ‘मेक इन इंडिया’चे वारे वाहत असताना देशात अजूनही महिलांना मंदिर प्रवेश, महिलांवर होणारे अत्याचार, मासिक पाळीच्या वेळी पाळली जाणारी निषिद्धता अशा अनेक महत्त्वांच्या विषयावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न आहे.

* करवंटीचे घर
नारळाच्या करवंटीपासून तयार करण्यात आलेल्या झोपडीसमान घरामुळे पावसाच्या पाण्याची बचत करता येऊ शकेल, अशी कल्पना या कलाकृतीतून स्पष्ट होते. देशातील गंभीर समस्यांपैकी अवकाळी पाऊस हा महत्त्वाचा विषय असून पाण्याच्या बचतीसाठी या नारळाच्या करवंटय़ांचा उपयोग केला जाऊ शकतो.

* रिकामी खिडकी
‘रिकामी खिडकी’ या कलाकृतीतून माणसाचे जन्म आणि मृत्यू हेच सत्य असून आपल्या जन्माचे प्रयोजन, गरज या सर्व गोष्टी महत्त्वाच्या नसून शेवटी आपल्या सर्वाच्या आयुष्याच्या खिडक्या या रिकाम्याच असतात रुची त्रिवेदी हिला सांगायचे आहे.

* प्रतीकात्मक पतंग
केशरी, पांढरा व हिरवा या रंगांचा वापर करून तयार करण्यात आलेली पतंग आशा, स्वातंत्र्य आणि ध्येयाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे तिरंग्याच्या रंगांमध्ये तयार करण्यात आलेली पतंग देशाला प्रगतिपथावर नेण्याची आशा आहे. क्रॉस मैदानावर प्रवेशद्वाराच्या डाव्या दिशेला उंचावर उडणारी ही पतंग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.

* रति विस्तार
महाभारतातील ‘रति विस्तार’ या शब्दाचा अर्थ असीम प्रेम आहे. या शीर्षकाअंतर्गत साकारण्यात आलेल्या कलाकृतीतून महाभारतातील पात्रांमधील प्रेम एका वेगळ्याच दृष्टीतून दाखविले गेले आहे.