परळच्या टाटा मेमोरियल रुग्णालयातून औषधांची चोरी करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक केली आहे. रुग्णालयातील औषधे चोरून बाहेर विकण्याचा हा प्रकार पूर्वीपासून सुरू असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
   कर्करोगाच्या उपचारासाठी आलेल्या रुग्णांची महागडी औषधे अतिदक्षता विभागातून गायब होत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले होते. त्यानुसार त्यांनी सुरक्षारक्षकांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. शुक्रवारी सुरक्षारक्षक जयवंत घोरपडे यांनी  दुपारी अचानक बाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची अंगझडती घेण्यास सुरुवात केली. त्या वेळी कर्मचारी अजित  कारोटिया (२७) आणि दिनेश दोडिया (२४) या दोघांच्या बॅगेत शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य आणि औषधे सापडली.
या दोघांकडून अडीच लाखांची औषधे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबतची तक्रार भोईवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तोंडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी, सचिन घाडगे, विश्वास भोसले, प्रीतेश शिंदे आदींच्या पथकाने तपास करून चोरलेली औषधे घेणारे दलाल राजू बागडे (४६) आणि राकेश बाबरिया (४६) यांना अटक केली. बाबरिया हा औषधांचा घाऊक व्यापारी आहे. अटक करण्यात आलेले रुग्णालयातील दोन्ही कर्मचारी गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यामुळे औषध चोरीचे हे रॅकेट फार पूर्वीपासून सुरू असल्याचा पोलिसांचा संशय असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.