नामांकित कंपन्यांना विक्री झाल्याचे उघड

औषधांसाठी लागणारा कच्चा माल अवैधरीत्या आयात करून तो ‘सन फार्मा’, ‘मेडले फार्मा, तिरुपती मेडिकेअर, एकुम्स ड्रग्ज आदी नामांकित कंपन्यांना विकला गेल्याची गंभीर बाब अन्न व औषध प्रशासनाने उघड केली आहे. याप्रकरणी प्रशासनाने भिवंडी येथील गोदामावर धाड टाकून सुमारे १२ हजार ७३० किलोचा साठा हस्तगत केला आहे. याआधीही सदर कंपनीने १० कोटी रुपये किमतीचा तीन लाख किलो कच्च्या मालाची   अवैधरीत्या आयात केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

मे. पायोमा केमिकल्स या कंपनीने लॅक्टिटॉल मोनोहायड्रेट हा औषधांसाठी लागणारा कच्चा माल चीन येथून आयात केला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना मिळाली होती. त्यानुसार या कंपनीच्या भिवंडी येथील गोदामावर धाडा टाकून सुमारे १२ हजार ३७० किलोचा साठा हस्तगत करण्यात आला. या साठय़ाची बाजारातील किंमत ४० लाख आहे. हा साठा प्रतिबंधित असल्याचे डॉ. कांबळे यांनी सांगितले. औषधांसाठी हे उत्पादन वापरले जात नसल्याची हमी संबंधित कंपनीने दिली होती. परंतु प्रत्यक्षात मलावरोधावर तयार करण्यात येणाऱ्या औषधांसाठी हा साठा नामांकित कंपन्यांना विकला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. संबधित कंपन्यांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.