‘वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर’ या पहिल्यावहिल्या मेट्रोने मुंबईकरांसह राज्य व केंद्र सरकारचे घामटे काढल्यानंतर आता ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या ‘मेट्रो-३’चे काम मार्च २०१६पासून सुरू करण्याची घोषणा मुंबई मेट्रो रेल महामंडळातर्फे (एमएमआरसी) करण्यात आली. या कामासाठीच्या निविदा प्रक्रियेचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी सांगितले. काम सुरू झाल्यानंतर २०२०पर्यंत हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, काळबादेवी आणि गिरगाव येथील प्रकल्पग्रस्तांवर कोणतीही जोरजबरदस्ती न करता त्यांच्याशी चर्चा करूनच जमिनींचे अधिग्रहण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक व्यापार केंद्रापासून ते सीप्झपर्यंत मुंबईतील सहा व्यापारी क्षेत्रांना जोडणारा ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ हा ३३.५ किलोमीटर लांबीचा मेट्रोमार्ग मुंबईतील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. २३,१३६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी जपानमधील कंपनी ‘जायका’ने ५७.२ टक्के म्हणजेच १३,२३५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे. या कामासाठी २७ विविध संस्थांच्या परवानग्यांची गरज असून त्यापैकी काही आधीच मिळवण्यात आल्याचे भिडे यांनी स्पष्ट केले. या मार्गावर एकूण २७ स्थानके असतील, असे भिडे यांनी सांगितले.

गिरगाव-काळबादेवी रहिवाशांचे काय?
मेट्रो-३ मार्गावरील स्थानकांसाठी गिरगाव-काळबादेवी येथील एकूण २६ इमारती जमीनदोस्त कराव्या लागणार आहेत. यात काळबादेवी भागातील १८ आणि गिरगावातील ८ इमारतींचा समावेश आहेत. या इमारतींमधील दुकाने आणि रहिवासी यांचे पुनर्वसन करताना किंवा या जमिनीचे अधिग्रहण करताना कोणतीही जबरदस्ती करण्यात येणार नाही. पुनर्वसनाबाबतही येथील रहिवाशांसह चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल. येथील रहिवाशांचा विरोध लांब स्थलांतर करण्यासाठी आहे. हे कसे टाळता येतील, याचा विचार साधकबाधक चर्चेनंतरच केला जाईल. त्यामुळे या प्रकल्पाला असणारा विरोध मावळण्यास हरकत नाही, असेही अश्विनी भिडे म्हणाल्या.

मेट्रो तीनच्या बांधकामासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. गेल्या काही प्रकल्पांतील चुकांमधून आम्ही धडे घेतले आहेत. परिणामी आखलेल्या वेळेतच काम पूर्ण होईल आणि २०२०पर्यंत मेट्रो दिमाखात धावेल.
– अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालिका, एमएमआरसी