‘म्हाडा’च्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस मंगळवारी अक्षय्य तृतीयेपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी अर्ज दाखल करण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबईतील आपल्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी हजारो अर्जदारांनी ‘अक्षय्य तृतीये’च्या मुहूर्तावर आपला ऑनलाइन नोंदणी अर्ज सादर केला. पहिल्याच दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत ७ हजार १०० अर्ज दाखल झाले असल्याची माहिती ‘म्हाडा’ प्रशासनाकडून देण्यात आली.
हे अर्ज भरण्यास दुपारी दोन वाजल्यापासून सुरुवात झाली. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १८ मे २०१५ रोजी सायंकाळी सहा अशी आहे. अर्ज सादर केलेल्यांपैकी ७७३ जणांनी अर्जासोबत सादर करायचे शुल्कही सादर केले. ‘म्हाडा’ घरांच्या लॉटरीसाठी १५ एप्रिल २०१५ या दिवशी दुपारी दोन वाजल्यापासून ऑनलाइन नोंदणीस सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत ३१ हजार ५८० जणांनी नोंदणी केली आहे.
दरम्यान, म्हाडाचे बनावट संकेतस्थळ आढळून आल्याने म्हाडाने सावधगिरीचे आवाहन केले आहे. अशा प्रकारांमुळे केतस्थळांमुळे फसवणुकीची शक्यता असल्याने अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज दाखल करावे, असे आवाहन केले.