वर्सोव्यातील कांदळवनांवरील अतिक्रमणाची म्हाडाकडून दखल

अभिनेता कपिल शर्मा याच्यासह वर्सोवा येथील वादग्रस्त ६५ बंगल्यांची जागा आपलीच असल्याचे मान्य करत अखेर ‘म्हाडा’ने बंगलेधारकांनी केलेल्या अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

याआधी ही जागा आपली नसल्याचा दावा म्हाडाने केला होता. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या बंगलेधारकांवर कारवाई कुणी करायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता ही जागा आपलीच असल्याचे पत्र ‘म्हाडा’ने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवल्याने या बंगल्यावरील कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

वर्सोवा येथील आरामनगर भागातील ६५ ‘धनाढय़’ बंगलेधारकांनी येथील कांदळवनांची कत्तल करून आपले इमले उभारले आहेत. याप्रकरणी ६५ बंगलेधारकांवर वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने बंगलेधारकांनी केलेल्या अतिक्रमणाची गंभीर दखल घेत मुंबई महानगरपालिका आणि ‘म्हाडा’ यांना ही अतिक्रमणे पाडून कांदळवनांची जागा मोकळी करावी, असे पत्राद्वारे सूचित केले होते. कारण हे बंगले ज्या जागेत उभे आहेत ती जागा ‘म्हाडा’ची असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे म्हणणे होते. तसेच, याबाबत पालिका अधिकारी आणि ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांची बैठकही ९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली होती. मात्र, बैठकीत ‘म्हाडा’च्या अधिकारी व अभियंत्यांनी कांदळवनांवर अतिक्रमण करण्यात आलेली जागा ‘म्हाडा’ची नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे अतिक्रमणे पाडण्याची कारवाई रखडली होती. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘लोकसत्ता मुंबई’ने १७ फेब्रुवारीला प्रकाशित केले होते. त्यानंतर महिनाभरातच म्हणजे ८ मार्चला म्हाडाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्राद्वारे कळवून ही जागा आपलीच असल्याचे मान्य केल्याची माहिती पुढे आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे गेल्या महिन्यातील ८ मार्चला ‘म्हाडा’ने वर्सोवा येथील बंगल्यांची जागा तसेच कांदळवनांखालील जागादेखील आमचीच असल्याचे मान्य केले आहे. ‘कांदळवने कापल्यामुळे संबंधित बंगलेधारकांची अतिक्रमणे पाडण्यात येतील व कारवाईबाबतचा प्रस्ताव आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे,’ असेही म्हाडाने जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविले आहे. या माहितीला ‘म्हाडा’तील एका उपअभियंत्यानेही दुजोरा दिला. या संदर्भात म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

‘ती’ नावे बेपत्ता

वर्सोव्यातील ६५ बंगलेधारकांनी कांदळवनांवर अतिक्रमण केल्यानंतर त्यांच्यावर वर्सोवा पोलीस ठाण्यात अंधेरीच्या तहसीलदार कार्यालयाने गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झालेल्या बंगलेधारकांची यादी ‘लोकसत्ता मुंबई’च्या हाती लागली आहे. मात्र, या यादीत बंगला क्रमांक १ ते बंगला क्रमांक ३४ च्या मालकांची नावे आहेत. परंतु, या यादीत बंगला क्रमांक ३५ ते बंगला क्रमांक ६४ च्या पुढे नावे नसून पुढील क्रमांकांपुढे ‘अमुक क्रमांकाच्या बंगल्यातील रहिवासी’ असा उल्लेख आहे. त्यामुळे बंगला क्रमांक ३५ ते बंगला क्रमांक ६४ च्या मालकांची नावे स्पष्ट झालेली नाहीत. त्यामुळे ही नावे देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याची शंका व्यक्त होत आहे. आम्हाला बंगलेधारकांची नावेच सापडली नसल्याचा अजब दावा जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याने केला. विशेष म्हणजे यातील बंगला क्रमांक ६५ हा अभिनेता कपिल शर्मा याचा आहे.