युवराज आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील गच्चीवरील हॉटेलचा प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत सभागृहाच्या बैठकीत मंजूर करण्याचा चंग शिवसेनेने बांधला आहे. मात्र भाजपने विरोध केल्यामुळे शिवसेनेपुढे पेच निर्माण झाला आहे. मात्र आता समाजवादी पार्टी आणि मनसेच्या मदतीने या प्रस्तावास मंजुरी देण्याचा शिवसेनेचा मनसुबा आहे. शिवसेनेची कोंडी हेरून आपल्या एका उपसूचनेद्वारे सर्वच व्यावसायिक इमारतींच्या गच्चीवर हॉटेल सुरू करण्याचा मार्ग मोकळा करून या प्रस्तावाचे श्रेय मिळविण्याची खेळी मनसेकडून खेळण्यात येत आहे.
मुंबईकरांना गच्चीवरील हॉटेलमध्ये संगीताचे स्वर ऐकत खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता यावा यासाठी हॉटेल इमारतींच्या गच्चीवर हॉटेल सुरू करण्याची संकल्पना शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी मांडली होती. त्याबाबतचा एक प्रस्ताव सुधार समितीत सादरही करण्यात आला होता. मात्र भाजपने घेतलेल्या विरोधी भूमिकेमुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. आता या प्रस्तावाला थेट सभागृहात मंजुरी देण्याचा शिवसेनेचा मनसुबा आहे. मात्र भाजपचा या प्रस्तावाला आजही विरोध आहे. त्यामुळे मंजुरीसाठी आवश्यक संख्याबळाचा पेच शिवसेनेपुढे पडला आहे.
सत्तेमध्ये वाटेकरी असलेल्या भाजपकडून मदत मिळण्याची शक्यता धुसर बनल्यामुळे आता शिवसेनेने समाजवादी पार्टी आणि मनसेच्या पाठिंब्यावर हा प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पार्टीने सुरुवातीपासूनच गच्चीवरील हॉटेलला पसंती दर्शविली आहे. हा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी पालिकेत खेटेही घातले होते. मात्र भाजपच्या मदतीशिवाय हा प्रस्ताव मंजूर होणे शक्य नाही.
 आता त्यावरही शिवसेनेने तोडगा शोधला आहे. सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेले अनेक दिवस मनधरणी केल्यानंतर आता या प्रस्तावाला पाठिंबा देण्याची तयारी मनसेने दर्शविली आहे. मात्र गच्चीवरील हॉटेलचे संपूर्ण श्रेय शिवसेनेला मिळू नये याची काळजी मनसेकडून घेण्यात येत आहे. केवळ हॉटेल इमारतींच्या गच्चीवरच नव्हे तर व्यावसायिक इमारतींच्या गच्चीवरही हॉटेल सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी अट मनसेने शिवसेनेला घातली आहे. आपल्या युवराजांचे स्वप्न साकारण्यासाठी शिवसेनेने ही अटही मान्य केली आहे. संख्याबळाची जुळवाजुळव झाल्याने पालिका सभागृहाच्या पुढील बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे. त्या वेळी मनसेतर्फे व्यावसायिक इमारतींच्या गच्चीवर हॉटेल सुरू करण्याबाबतची उपसूचना मांडण्यात येणार आहे. त्यामुळे मॉल आणि अन्य व्यावसायिक इमारतींच्या गच्चीवर हॉटेल सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
दरम्यान, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता समाजवादी पार्टी आणि मनसेच्या मदतीने मंजूर केला जाणारा इमारतीच्या गच्चीवरील हॉटेलचा प्रस्ताव शिवसेना-भाजप युतीमधील ठिणगी ठरणार आहे.

प्रसाद रावकर, मुंबई</strong>