मनसे नगरसेवक फूटप्रकरणी मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवक शिवसेनेने तीन कोटी रुपयांना खरेदी केल्यासंदर्भात भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येईल तसेच शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील वेगवेगळ्या आरोपांबाबत आपण त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी सोमय्या यांना भेटीसाठी वेळ देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मनसेच्या सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसविण्याचे भाजपचे स्वप्न भंग झाल्यामुळे अस्वस्थ झालेल्या किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर जोरदार आरोप केले. भांडुप येथील पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाल्यानंतर आता सेनेचा महापौर सत्तेवरून खेचून काढू, असे भाष्य सोमय्या यांनी केले होते. त्यानंतर लगेचच शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवक फोडून त्यांना शिवसेनेत दाखल करून भाजपला शह दिला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या सोमय्या यांनी शिवसेनेवर आरोपांच्या फैरी झाडल्या. शिवसेनेने हे सहा नगरसेवक तीन ते पाच कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता. या घोडेबाजारासंदर्भात त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रारही केली होती. यापूर्वीही सोमय्या यांनी ‘मातोश्री’वर अनेक आर्थिक आरोप केले होते. तसेच उद्धव यांना मालमत्ता जाहीर करण्याचे आव्हानही दिले होते. ‘वर्षां’ या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सोमय्या यांनी ‘एसीबी’कडे केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येईल. त्यांना भेटण्यासाठी वेळही देणार आहे, असे त्यांनी सांगितले. मनसेचे नगरसेवक भाजपमध्ये येणार होते का, अशी विचारणा केली असताना राजकारणात काही गोष्टी उघड करायच्या असतात तर काही करायच्या नसतात असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले. तथापि याबाबत थेट विचारणा केल्यानंतर मनसेच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र आम्ही त्यांना घेतले नाही, असेही त्यांनी सांगितले.

बुलेट ट्रेनची वीट जमिनीखाली रचणार

एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर राज ठाकरे यांनी मुंबईत बुलेट ट्रेनची एक वीटही रचू देणार नाही, असा इशारा दिला होता.  याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, बुलेट ट्रेनची वीट आम्ही जमिनीखाली रचू. तसेच फेरीवाल्यांच्या प्रश्नावर गंभीरपणे कारवाई केली जाईल.