मोबाइलच्या चॅटअ‍ॅप्समधून ‘कनेक्टेड’ राहणाऱ्या, त्याच व्यक्तींशी प्रत्यक्षात संवाद साधण्यासाठी घाबरणाऱ्या आजच्या ‘डिस’कनेक्टेड पिढीचे वास्तव मांडणाऱ्या ‘बीइंग सेल्फिश’ या एकांकिकेपासून ‘लोकांकिका’च्या अंतिम फेरीची झालेली सुरुवात बुद्धाच्या ‘धम्म’वर येऊन थांबली. विचारातून मनात बुद्ध उतरला, की त्याचं आणि आपलं वेगळं अस्तित्वच उरत नाही, हा विचार देऊन जेव्हा ‘मड वॉक’ या एकांकिकेवर अंतिम फेरी संपली तेव्हा समोर बसलेले मान्यवर रंगकर्मीही थक्क झाले होते.
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचा अंतिम सोहळा शनिवारी रवींद्र नाटय़मंदिरात रंगला. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी, ठाणे, अहमदनगर अशा आठ शहरांमधल्या आठ एकांकिका प्राथमिक फेरी, विभागीय अंतिम फेरी असा प्रवास करत अखेरच्या टप्प्यावर पोहोचल्या होत्या. ‘लोकांकिका’त पहिल्यांदाच सहभागी होत असतानाही सामाजिक, धार्मिक ते अगदी नात्यांमधली भावनिक गुंतागुंतही सहजी हाताळणाऱ्या तरुणाईने प्राथमिक फेरीतच आपली चमक दाखवून दिली होती, मात्र अंतिम फेरीत एकांकिका सादर करताना केवळ आशयावरच नव्हे, तर आशयाबरहुकूम नेपथ्य, प्रकाशयोजना आदी तंत्रांवरही आपली तेवढीच हुकमत असल्याचे स्पर्धकांनी जाणवून दिले. प्रोजेक्टरवर धडाधड पडणाऱ्या पोस्ट्स, समोर असलेल्या दोन ठोकळ्यांच्या अवकाशात एका मोबाइलवर इतक्या तरुणींशी न थकता गप्पा मारत राहणारा तरुण, व्हच्र्युअल संवादाच्या नादात खरा संवाद हरवून बसलेला आजचा तरुण जेव्हा सगळं गमावल्यावर अक्कल कमावली, असं म्हणत आपला मोबाइल शट डाऊन करतो, तेव्हा संपूर्ण सभागृह टाळय़ांच्या कडकडाटाने दणाणून गेले. म. ल. डहाणूकर महाविद्यालयाच्या ‘बीइंग सेल्फिश’ या एकांकिकेला मिळालेली ती पहिली दाद होती.
रामाच्या नावावरून केलं जाणारं राजकारण जसं पारंपरिक पोहाडा पद्धतीच्या सहकार्याने ‘हे राम’ नाशिकच्या विद्यार्थ्यांनी रंगवलं तेव्हाही त्यांनी ज्या संयत पद्धतीने विषयाची मांडणी केली ती प्रेक्षकांची दाद घेऊन गेली. पुण्याच्या आय.एल.एस. महाविद्यालयाची ‘चिठ्ठी’ ही एकांकिकाही त्याच्या विषयासाठी आणि नेपथ्यासाठी दाद घेऊन गेली. शिकण्यासाठी आपल्या पत्नीच्या मागे धोशा लावणारा आत्माराम आणि नवऱ्याच्या संशयातून का होईना गमभनचे धडे गिरवणारी पत्नीच्या सहजस्वभावानेही सगळ्यांचे मन जिंक ले. ठाणे विभागातील सीएचएम महाविद्यालयाची ‘मड वॉक’ आणि  ‘कबूल है’ या सिग्मंड फ्रॉइडचे मानसशास्त्र वास्तव घटनांच्या मदतीने उलगडून सांगणाऱ्या एकांकिकांनी प्रत्येक संवादावर टाळ्या घेतल्या. नेपथ्य, संवाद, अभिनय, संहिता सगळ्याच आघाडीवर दमदार ठरलेल्या या एकांकिकांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’ महोत्सवात खऱ्या अर्थाने रंग भरले.

आयरिस प्रॉडक्शनला ‘लोकांकिकां’चा खूप फायदा झाला
– विद्याधर पाठारे
गेली कित्येक वर्षे ‘आयरिस’ टॅलेंट हंट करत आहे; पण एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर नवे कलाकार, लेखक, तंत्रज्ञ यांचा शोध घेण्यात आम्हाला यश आले नव्हते. ‘लोकसत्ता लोकांकिकां’च्या माध्यमातून आठ शहरे, प्रत्येक शहरात जवळपास वीस एकांकिका झाल्या. म्हणजे किती मोठय़ा प्रमाणावर स्थानिक कलाकार आमच्यासमोर आले हे तुम्हाला लक्षात येईल. आत्तापर्यंत मुंबई, पुण्यासारख्या काही शहरांमधून ओळखीच्या लोकांच्या मदतीने आम्ही ऑडिशन घेत आलो आहोत; पण तिथेही के वळ त्यांच्या ओळखीचे कलाकार आमच्यासमोर येतात. मग आहे त्यात निवड करावी लागते. या स्पर्धेनंतर तसे होणार नाही. आता आमच्याकडे निवडीसाठी पर्याय आहेत. लोकांकिकांमधून निवडलेले कलावंत, लेखक हे केवळ आयरिसपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर मराठीतील इतर प्रॉडक्शन कंपन्यांनाही त्यांची माहिती दिली जाईल. ‘लोकांकिका’ंसारख्या स्पर्धा पुन:पुन्हा होत राहायला हव्यात.

लोकसत्ता सर्वोत्तम नाटय़ानुभव..
लोकसत्ता म्हणजे दर्जेदार आणि चांगले असे समीकरण असून एकांकिका स्पर्धेच्या निमित्तानेही हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. नवे विषय, नव्या संहिता, कलाकार, लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळतात आणि त्यातूनच त्याची कला सिद्ध होते. असे उपक्रम वारंवार व्हायला हवेत. तरच नवीन पिढीला चांगले व्यासपीठ मिळेल.  
– गोपाळ अलगेरी (नाटय़ निर्माते, सुयोग संस्था)

सर्वसमावेशक स्पर्धा..
महाराष्ट्रातील आठ केंद्रांतून सादर झालेल्या या एकांकिकांमुळे राज्यभरातील तरुण रंगकर्मीना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. हिंदी-मराठी चित्रपटांचे, विशेषत: बॉलीवूडचे मुख्यालय म्हणून ओळख असलेली मुंबई आता मराठी नाटय़सृष्टीची पंढरी झाली आहे. ‘लोकसत्ता’ची ‘लोकांकिका’ ही नवोदितांसाठीची एक प्रयोगशाळाच आहे. नवे प्रयोग करून सादरीकरणाच्या कोणत्याही क्षेत्रात जाण्याची संधी या महोत्सवातून मिळूू शकेल.
– राजू जोशी (लेखक)  

युवाशक्तीचा मनमुराद आनंद देणारी स्पर्धा..
युवाशक्तीने उत्साहाने यामध्ये कला सादर केली असून सध्याच्या काळातील युवकांचे भावविश्व साकारण्याबरोबरच सामाजिक विषयांची हाताळणी या स्पर्धेत पाहायला मिळाली. व्यावसायिक नाटकांनाही लाजवणाऱ्या एकांकिका या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. याच विषयांमधून रंगभूमीला नवे विषय मिळू शकणार आहेत. कदाचित यातीलच चांगल्या, दुर्मीळ आणि लक्षात राहणाऱ्या एकांकिका रसिकांना व्यावसायिक रंगभूमीवरही पाहता येऊ शकणार आहेत. नव्या रंगकर्मीच्या कलाविष्काराने उत्तरोत्तर रंगत जाणारी ही स्पर्धा रसिकांना आणि नाटय़प्रेमींना आनंद देणारी अशीच आहे.
– अमोल साळवी (लेखक दिग्दर्शक)

सवाई आनंद देणारी स्पर्धा..
आत्तापर्यंत दर्जेदार एकांकिका पाहायच्या असल्यास सवाईचे नाव आदराने घेतले जात होते. आत्ता यापुढे सवाईच्या तोडीच्या एकांकिका पाहायच्या असतील तर प्रेक्षक निश्चितच ‘लोकसत्ता’च्या ‘लोकांकिके’चा उल्लेख करतील. लोकांकिका पाहत असताना सुरुवातीपासूनच मला सवाईची अनुभूती येत आहे. त्यामुळे सवाई नाटय़स्पर्धा ज्याला पाहता येणार नाही त्यांनी निश्चितपणे ‘लोकांकिका’ स्पर्धेला येऊन सवाईचा आनंद इथे घ्यावा
– प्रथमेश परब (टाइमपास फेम अभिनेता)
 
१ चिठ्ठी  (पुणे)
२ मसणातलं सोनं(नगर)
३ कबुल है (चिपळूण)
४ बिंईग सेल्फीश (मुंबई)

‘लोकांकिका’हटके विषयांच्या
lk02
lk03lk04  छाया : दिलीप कागडा, गणेश शिर्सेकर, प्रदीप कोचरेकर