मुंबईच्या पावसाची बातच काही और. विजांच्या कडकडाटात धो धो कोसळत, संततधार लावणारा हा पाऊस या वर्षी मात्र कुठे तरी हरवल्यासारखा वाटत होता. जूनचे पहिले तीन आठवडे अक्षरश कोरडे गेल्यावर रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत त्याने दिमाखात प्रवेश केला आणि मुंबईकरांनी ‘पहिला पाऊस’ मनमुराद अनुभवला. काहींनी भरदुपारी चादर ओढून मस्त ताणून दिले, तर अनेकांनी उधळलेल्या समुद्राच्या साक्षीने पावसाचे आगमन जल्लोषात साजरे केले.

दर वर्षी साधारण जूनच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस मुंबईत प्रवेशतो. या वेळीही १२ जून रोजी मोसमी वाऱ्यांसोबत तो आल्याचे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले असले तरी मुंबईकरांना त्याचा अनुभवच येत नव्हता. दिवसभरात येणाऱ्या एखाददुसऱ्या सरीला पाऊस मानायला मुंबईकर तयार नव्हते. शनिवारी दिवसभर पावसाने काळोख केला असला तरी सरी मात्र काही येत नव्हत्या. शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विजांचा लखलखाट व त्यापाठोपाठ ढगांच्या प्रचंड गर्जना ऐकू येऊ लागल्या व मुंबईकरांना ओळखीच्या पावसाची खूण पटली. मध्यरात्रीपासून सरींचा आवाज वाढू लागला व लांबलेल्या उन्हाळ्यापासून सुटका झाली. सकाळी सात वाजताही रात्रीएवढाच काळोख होता. नऊ वाजेपर्यंत रस्त्यांवरचे, इमारतींचे दिवे सुरूच ठेवावे लागले. पावसाचा जोर कमी झाला तरी मध्यम सरी सुरूच राहिल्या. या पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले असले तरी सुट्टीचा वार असल्याने मुंबईकरांनी या पावसाची मजाच जास्त अनुभवली. लहानग्यांनी या खऱ्याखुऱ्या पावसात भिजून दिवस साजरा केला. दुपारच्या थंडीत अनेकांनी पांघरुण लपेटत ताणून दिले. दुपारनंतरही सुरू राहिलेल्या भुरुभुरु पावसात मुंबईकरांनी आवडीचा समुद्रकिनारा गाठला. कोळशावर भाजलेल्या मक्याच्या कणसांचा वास हवेत दरवळू लागला. वाऱ्यामुळे समुद्राला आलेले उधाण अनुभवायला आलेल्यांमुळे संपूर्ण किनाऱ्यावर जत्रा भरल्यासारखे वाटत होते. संध्याकाळी उशिरा पावसाचा जोर कमी झाला तरी मुंबईकरांचा उत्साह जराही आटला नव्हता.